
मुंबई - JPN NEWS, दि. ४ ऑगस्ट २०२६ :
एरिया बेसच्या नावाखाली मोटर लोडर कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ कामाऐवजी रस्ते सफाईचे काम करण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप करत, संबंधित कामगारांनी हे काम ‘अंडर प्रोटेस्ट’ (निषेध नोंदवत) स्वीकारावे, असे आवाहन मुंबई मनपा खाजगीकरण विरोधी समितीचे निमंत्रक डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी केले आहे.
समितीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी-दक्षिण विभागात मोटर लोडर कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियोजित कामावर न ठेवता सेक्शन चौक्यांवर पाठवून रस्ते सफाईची कामे दिली जात आहेत. याबाबत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता धीरज बांगर यांच्याशी चर्चा केली असता, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितल्याचा दावा समितीने केला आहे.
या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागण्याची तयारी सुरू असल्याचे सांगत, ज्या विभागांमध्ये मोटर लोडर कर्मचाऱ्यांना सेक्शन चौकी किंवा इतर ठिकाणी बदली करून काम दिले जात आहे, त्यांनी ते काम निषेध नोंदवत स्वीकारावे आणि त्याबाबतचे लेखी निवेदन संबंधित विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या निवेदनाची प्रत समितीकडेही तातडीने जमा करावी, जेणेकरून इतर कागदपत्रांसह ती न्यायालयात पुरावा म्हणून सादर करून कथित खाजगीकरणाविरोधात स्थगिती आदेश (स्टे ऑर्डर) मिळविण्यास मदत होईल, असे डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी म्हटले आहे.


No comments:
Post a Comment