आयएमएसह सहा प्रमुख डॉक्टर संघटना सेंट्रल मार्डच्या पाठीशी; 5 ऑगस्टपासून केईएम, सायन, नायर, कूपरची नियमित ओपीडी बंद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 August 2026

आयएमएसह सहा प्रमुख डॉक्टर संघटना सेंट्रल मार्डच्या पाठीशी; 5 ऑगस्टपासून केईएम, सायन, नायर, कूपरची नियमित ओपीडी बंद


मुंबई - JPN NEWS, दि. ४ ऑगस्ट २०२६ : 
सेंट्रल मार्डने पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनाला आयएमएसह सहा प्रमुख वैद्यकीय संघटनांनी पाठिंबा जाहीर केला असून, ५ ऑगस्टपासून केईएम, सायन, नायर आणि कूपर या मुंबई महापालिकेच्या चार प्रमुख रुग्णालयांतील नियमित ओपीडी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए), बीएमसी मार्ड, महाराष्ट्र स्टेट रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन (एमएसआरडीए), असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्स (एएसएमआय), महाराष्ट्र असोसिएशन ऑफ गॅझेटेड मेडिकल ऑफिसर्स ग्रुप-ए (मॅगमो) आणि महाराष्ट्र स्टेट मेडिकल टीचर्स असोसिएशन (एमएसएमटीए) यांनी संयुक्त निवेदनाद्वारे आंदोलनाला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. रुग्णांची सुरक्षितता, पुराव्यावर आधारित आधुनिक वैद्यकीय उपचारपद्धती आणि वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता यांच्याशी कोणतीही तडजोड होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका या संघटनांनी घेतली आहे.

संघटनांनी राज्य सरकारकडे मुंबई उच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत सीसीएमपी पात्रता असलेल्या बीएचएमएस डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (एमएमसी) नोंदणी स्थगित ठेवण्याची, निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने चर्चा करून तोडगा काढण्याची आणि वैद्यकीय शिक्षणाचे निकष कायम राखण्याची मागणी केली आहे.

बीएमसी मार्ड आणि सेंट्रल मार्डच्या नेतृत्वाखाली केईएम, लोकमान्य टिळक (सायन), बी.वाय.एल. नायर आणि कूपर रुग्णालयांतील निवासी डॉक्टर ५ ऑगस्टपासून नियमित ओपीडी सेवा बंद ठेवणार आहेत. या आंदोलनात राज्यभरातील निवासी डॉक्टर सहभागी होणार असून, सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

तथापि, आपत्कालीन सेवा, कॅज्युअल्टी, आयसीयू, प्रसूती विभाग आणि इतर सर्व अत्यावश्यक व जीव वाचविणाऱ्या सेवा पूर्ववत सुरू राहतील, असे डॉक्टर संघटनांनी स्पष्ट केले आहे.

राज्यातील जवळपास सर्व प्रमुख डॉक्टर संघटना एकाच व्यासपीठावर आल्याने हे आंदोलन अधिक व्यापक आणि निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत. आता सरकार या आंदोलनावर काय भूमिका घेते, याकडे राज्यभरातील वैद्यकीय क्षेत्रासह लाखो रुग्णांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS