
मुंबई JPN NEWS - फलटण, सातारा येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. राजेंद्र रुपनवर यांच्या अकाली निधनाने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 27 ऑगस्ट 2026 रोजी सायन स्टेशन येथे त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांना सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच 31 ऑगस्ट रोजी त्यांचे निधन झाले. या पार्श्वभूमीवर डॉ. रुपनवर यांच्या मृत्यूपूर्वीच्या परिस्थितीची स्वतंत्र, निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशी करण्यात यावी, अशी मागणी BMC MARDने केली आहे.
BMC MARDने (31 ऑगस्ट रोजी) प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटमध्ये या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तरुण डॉक्टरचा अशा प्रकारे झालेला मृत्यू ही अत्यंत वेदनादायक आणि चिंताजनक बाब असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
छळ आणि राजकीय दबावाच्या आरोपांची चौकशी करा -
डॉ. रुपनवर यांच्या मृत्यूमागील नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नसली, तरी कामाच्या ठिकाणी होणारा कथित छळ तसेच बाह्य किंवा राजकीय दबावासंदर्भातील आरोप गंभीर असल्याचे BMC MARDने म्हटले आहे. डॉक्टरांना वैद्यकीय कर्तव्य बजावताना धमकी, मानसिक छळ, दबाव, दडपशाही किंवा कोणत्याही प्रकारचा अनुचित बाह्य हस्तक्षेप सहन करावा लागू नये, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे.
सर्व आरोपांची सखोल चौकशी करण्याची मागणी -
डॉ. रुपनवर यांच्या मृत्यूपूर्वीच्या परिस्थितीची वेळबद्ध, स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. तसेच छळ, धमकी, दबाव, जबरदस्ती किंवा बाह्य हस्तक्षेपाचे आरोप नेमके कितपत खरे आहेत, याची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती पारदर्शकपणे समोर आणावी, अशी मागणी BMC MARDने केली आहे. चौकशीत कोणी दोषी आढळल्यास संबंधितांवर कायदा आणि योग्य न्यायप्रक्रियेनुसार कठोर कारवाई करण्यात यावी, असेही संघटनेने स्पष्ट केले आहे.
डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर -
या घटनेनंतर डॉक्टरांच्या कार्यस्थळावरील सुरक्षितता आणि वैद्यकीय निर्णयांमध्ये होणाऱ्या कथित बाह्य हस्तक्षेपाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. डॉक्टरांना कोणत्याही भीती, धमकी, दबाव किंवा अनुचित हस्तक्षेपाशिवाय वैद्यकीय सेवा बजावता यावी, यासाठी सुरक्षित आणि सन्मानजनक कार्यपरिसर उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे, असे BMC MARDने म्हटले आहे.
दरम्यान, BMC MARDने डॉ. राजेंद्र रुपनवर यांच्या कुटुंबीय, मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांप्रती मनःपूर्वक संवेदना व्यक्त केल्या आहेत. या दुःखद प्रसंगी संघटना त्यांच्या कुटुंबीय आणि सहकाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
डॉ. रुपनवर यांच्या मृत्यूमागील परिस्थितीची निष्पक्ष, पारदर्शक आणि सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी ठाम मागणी BMC MARDने केली आहे.


No comments:
Post a Comment