
जळगाव JPN NEWS - अध्यात्मिक वातावरणाला डिजिटल सुरक्षेची जोड देत प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, जळगाव येथे सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाइन फसवणुकीपासून सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमातून महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.
सोमनाथ वडनेरे यांच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमाला मीनाक्षी दीदी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी Quick Heal Foundationच्या Cyber Warrior उपक्रमातील साक्षी पाटील, विद्या सोनवणे, अक्षय पाटील आणि लोकेश पाटील यांनी उपस्थितांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले.
ऑनलाइन व्यवहार करताना होणारी फसवणूक, OTP, Phishing, Fake Links, Password Security आणि Social Media Safety यांसह विविध विषयांवर उपस्थितांना माहिती देण्यात आली. सायबर गुन्हेगारांकडून वापरल्या जाणाऱ्या विविध पद्धती आणि त्यापासून बचाव करण्यासाठी घ्यावयाची खबरदारी याबाबतही Cyber Warriors यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान काही उपस्थितांनी त्यांच्यासोबत घडलेल्या ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांचे अनुभव सांगत प्रश्न उपस्थित केले. Cyber Warriors यांनी त्यांच्या शंकांचे निरसन करून फसवणूक झाल्यास कोणती तातडीची पावले उचलावीत, कोणाकडे तक्रार करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, याबाबत सविस्तर माहिती दिली.
विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार करताना अधिक सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले. OTP, PIN, पासवर्ड, बँक खात्याची माहिती किंवा इतर गोपनीय माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीस देऊ नये, तसेच संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये, असा संदेश यावेळी देण्यात आला.
अध्यात्मिक व्यासपीठावरून सायबर सुरक्षेचा संदेश देणारा हा उपक्रम ज्येष्ठ नागरिकांसह उपस्थितांसाठी उपयुक्त ठरला.


No comments:
Post a Comment