दगडसांगवीच्या पाणीप्रश्नावर प्रशासन नमले; १२ दिवसांत जलजीवन योजना सुरू करण्याचे आश्वासन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 August 2026

दगडसांगवीच्या पाणीप्रश्नावर प्रशासन नमले; १२ दिवसांत जलजीवन योजना सुरू करण्याचे आश्वासन


दगडसांगवी, ता. लोहा, जि. नांदेड JPN NEWS : 
जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनेतील अपूर्ण कामे, तांत्रिक त्रुटी आणि गावात नियमित पाणीपुरवठा होत नसल्याच्या निषेधार्थ दगडसांगवी ग्रामस्थांनी केलेल्या सामूहिक उपोषणाची अखेर प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर सांगता झाली. येत्या १२ दिवसांत गावातील जलजीवन योजनेचा पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहे.

गावातील जलजीवन योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित नसल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. योजनेतील अपूर्ण व तुटलेली कामे पूर्ण करणे, विद्युत पुरवठा सुरळीत करणे, खराब नळजोडण्या व पाइपलाइन दुरुस्त करणे आणि गावातील प्रत्येक भागाला नियमित पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी तुळशीराम पाटील मोरतळे, धोंडीबा पाटील फाजगे आणि आनंदा पाटील फाजगे यांच्या नेतृत्वाखाली १४ व १५ ऑगस्ट रोजी सामूहिक लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

या आंदोलनाची दखल घेत जिल्हा परिषद नांदेडच्या पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता बनसोडे आणि कनिष्ठ अभियंता मोरे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी ग्रामस्थांनी जलजीवन योजनेच्या प्रत्यक्ष स्थितीबाबत अधिकाऱ्यांसमोर नाराजी व्यक्त केली.

ग्रामस्थांनी योजनेतील तुटफूट दुरुस्त करणे, विद्युत पुरवठा सुरळीत करणे, पाइपलाइन व नळजोडण्या दुरुस्त करणे आणि गावातील सर्व भागांना समान व नियमित पाणीपुरवठा करणे, या प्रमुख मागण्या मांडल्या.

दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल रावसाहेब सर यांनी दूरध्वनीद्वारे ग्रामस्थांशी संवाद साधला. “बारा दिवसांच्या आत दगडसांगवी येथील पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात येईल,” असे त्यांनी आश्वासन दिले. संबंधित अधिकाऱ्यांकडूनही ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत लेखी आश्वासन देण्यात आले.

प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी सामूहिक उपोषण मागे घेतले. मात्र, आता १२ दिवसांची मुदत प्रशासनासाठी कसोटीची ठरणार असून, प्रत्यक्ष गावातील प्रत्येक कुटुंबाला नियमित पाणी मिळेपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.

“आम्हाला केवळ आश्वासन नको, तर गावातील नळाला प्रत्यक्ष पाणी हवे. प्रशासनाने दिलेला शब्द पाळून जलजीवन योजना पूर्ण क्षमतेने सुरू करावी,” अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

आता प्रशासनाकडून दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी कधी होते आणि दगडसांगवीचा पाणीप्रश्न प्रत्यक्षात कधी सुटतो, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS