महिलांना १०० टक्के अनुदानावर ‘पिंक ई-रिक्षा’ द्या; नगरसेविका मनिषा यादव यांची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 August 2026

महिलांना १०० टक्के अनुदानावर ‘पिंक ई-रिक्षा’ द्या; नगरसेविका मनिषा यादव यांची मागणी


मुंबई - JPN NEWS, दि. ५ ऑगस्ट २०२६: 
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'महिला व बाल कल्याण योजना' अंतर्गत पात्र महिलांना १०० टक्के अनुदानावर 'पिंक इलेक्ट्रिक रिक्षा' उपलब्ध करून देण्याची योजना सुरू करावी, अशी मागणी भाजपच्या नगरसेविका तथा स्थायी समिती सदस्य मनिषा कमलेश यादव यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

यासंदर्भात मनिषा यादव यांनी महापालिका सभागृहात मांडण्यासाठी ठरावाची सूचना दिली आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी आणि त्यांना स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राबविण्यात यावी, असे त्यांनी म्हटले आहे.

सध्या महापालिकेच्या महिला व बाल कल्याण योजनेतून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील महिलांना शिवणयंत्र, पिठाची गिरणी, ब्युटी पार्लर साहित्य, खाद्यपदार्थ निर्मिती उपकरणे, संगणक तसेच इतर स्वयंरोजगारासाठी लागणाऱ्या साहित्यावर अनुदान दिले जाते. या योजनेत 'पिंक इलेक्ट्रिक रिक्षा'चाही समावेश करावा, अशी त्यांची मागणी आहे.

महिलांना ९० ते १०० टक्के अनुदानावर ई-रिक्षा उपलब्ध झाल्यास त्यांना सुरक्षित आणि पर्यावरणपूरक रोजगाराचा पर्याय मिळेल. तसेच अनेक महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहून कुटुंबाच्या उत्पन्नात हातभार लावू शकतील, असा दावा यादव यांनी केला आहे.

या योजनेसाठी आवश्यक निधी, लाभार्थी निवडीचे निकष आणि अंमलबजावणीची कार्यपद्धती निश्चित करून लवकरात लवकर योजना सुरू करावी, अशी मागणीही त्यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS