Ladki Bahin Yojana - १ कोटी महिलांचा ₹१,५०० हप्ता बंद! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 August 2026

Ladki Bahin Yojana - १ कोटी महिलांचा ₹१,५०० हप्ता बंद!


मुंबई JPN NEWS - मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी संख्येत मोठी घट झाल्याची माहिती समोर आली आहे. ई-केवायसी आणि पात्रता निकषांच्या पडताळणीनंतर योजनेतील लाभार्थ्यांची संख्या सुमारे अडीच कोटींवरून दीड कोटींच्या आसपास आल्याचे सांगितले जात आहे.

माहिती अधिकारातून समोर आलेल्या माहितीनुसार, विविध कारणांमुळे ९२ लाखांहून अधिक महिला अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे सुमारे एक कोटी महिलांना दरमहा मिळणारा १,५०० रुपयांचा लाभ बंद झाल्याची चर्चा आहे.

यामध्ये ई-केवायसी पूर्ण न केलेल्या सुमारे ६२ लाख महिलांचा सर्वाधिक समावेश आहे. तसेच वार्षिक कौटुंबिक उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा अधिक असलेल्या सुमारे १६ लाख महिलांनाही योजनेतून वगळण्यात आले आहे.

शासकीय सेवेत कार्यरत असल्याचे आढळलेल्या सुमारे ४.५० लाख महिला, इतर सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या ३.६० लाख महिला आणि निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक कुटुंबातील सदस्यांनी लाभ घेतलेल्या सुमारे अडीच लाख प्रकरणांवरही कारवाई करण्यात आली आहे.

याशिवाय, ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सुमारे १.८० लाख महिला तसेच तपासणीत संशयास्पद आढळलेली सुमारे १.७० लाख खातीही बंद करण्यात आल्याची माहिती आहे.

लाभार्थ्यांची संख्या कमी झाली असली तरी योजनेवरील सरकारचा आर्थिक भार अद्याप मोठा आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, योजनेसाठी दरमहा सुमारे २,४८४.९२ कोटी रुपये, तर वर्षाला जवळपास २९,८१९ कोटी रुपये खर्च होत असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना यापूर्वी वितरित झालेल्या रकमेची वसुली करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, ही वसुली अपेक्षित वेगाने होत नसल्याने त्यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

ई-केवायसी न करणाऱ्या पात्र महिलांना पुन्हा संधी मिळणार का आणि अपात्र लाभार्थ्यांकडून वितरित रकमेची पूर्ण वसुली कधी होणार, याकडे आता राज्यातील महिलांचे आणि सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS