
मुंबई JPN NEWS - मुंबईकर आणि पर्यटकांच्या सोयीसाठी नेहरू विज्ञान केंद्र मेट्रो स्थानक ते वरळी प्रॉमेनेड आणि प्रस्तावित लँडस्केप गार्डनला जोडणाऱ्या भूमिगत पादचारी मार्गाच्या उभारणीचा प्रस्ताव स्थायी समितीने बहुमताने मंजूर केला आहे. या प्रकल्पासाठी ₹७०२ कोटी ४४ लाख ३५ हजार ७ रुपये खर्च करण्यात येणार असून, मार्गाचे बांधकाम मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमार्फत केले जाणार आहे.
सुमारे १ किलोमीटर लांबीचा आणि ७.५ मीटर रुंदीचा हा भूमिगत पादचारी मार्ग असणार आहे. नेहरू विज्ञान केंद्र मेट्रो स्थानकावर उतरलेल्या प्रवाशांना पुढे पायी वरळी प्रॉमेनेड तसेच प्रस्तावित लँडस्केप गार्डनपर्यंत थेट पोहोचता येणार आहे.
समुद्रकिनारा रस्ता प्रकल्पालगत सुमारे ३०० एकर क्षेत्रावर लँडस्केप गार्डन विकसित करण्याचे प्रस्तावित आहे. या परिसरात नागरिक आणि पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता सार्वजनिक वाहतुकीशी थेट जोडणी निर्माण करण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे.
स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी सांगितले की, मेट्रो-३, समुद्रकिनारा रस्ता, वरळी प्रॉमेनेड आणि लँडस्केप गार्डन यांना जोडणारा हा मार्ग भविष्यात मुंबईच्या पर्यटनासाठी महत्त्वाचा दुवा ठरेल. मेट्रोच्या माध्यमातून नागरिकांना कमी खर्चात या परिसरात पोहोचता येणार असल्याने खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल.
या कामासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने जून २०२५ मध्ये तयारी दर्शवली होती. डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या संयुक्त बैठकीनंतर हे काम एमएमआरसीएलमार्फत करण्यास महापालिका आयुक्तांनी मान्यता दिली. प्रकल्पाचा आर्थिक भार महापालिका उचलणार आहे.
“कंत्राटदारामार्फत काम देण्याऐवजी मेट्रो-३ची तांत्रिक क्षमता वापरून हे काम अधिक प्रभावीपणे पूर्ण केले जाणार आहे. मुंबईकरांच्या हितासाठी अत्याधुनिक, सुरक्षित आणि सुलभ पादचारी सुविधा निर्माण करणे हा या निर्णयामागील उद्देश आहे,” असे प्रभाकर शिंदे यांनी स्पष्ट केले.
या भूमिगत मार्गामुळे सार्वजनिक वाहतूक, पादचारी सुविधा आणि पर्यटन यांना एकाच वेळी चालना मिळणार असून, वरळी परिसरातील नागरिकांसाठी आणि पर्यटकांसाठी हा महत्त्वाचा वाहतूक दुवा ठरणार आहे.


No comments:
Post a Comment