ट्रॉमा केअर रुग्णालयात महापौरांची आकस्मिक पाहणी; २४ तास नोंदणी कक्षासह रुग्णसेवेसाठी महत्त्वाच्या सूचना - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 August 2026

ट्रॉमा केअर रुग्णालयात महापौरांची आकस्मिक पाहणी; २४ तास नोंदणी कक्षासह रुग्णसेवेसाठी महत्त्वाच्या सूचना


मुंबई JPN NEWS - जोगेश्वरी (पूर्व) येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर महानगरपालिका रुग्णालयाची महापौर रितू तावडे यांनी १९ ऑगस्ट रोजी आकस्मिक पाहणी केली. यावेळी रुग्णांशी थेट संवाद साधत त्यांनी रुग्णालयातील वैद्यकीय सेवा, औषधांची उपलब्धता, स्वच्छता आणि आहाराचा दर्जा याची माहिती घेतली. रुग्णसेवा अधिक प्रभावी करण्यासाठी प्रशासनाला विविध सूचना देण्यात आल्या.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा नोंदणी कक्ष सध्या सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत कार्यरत असतो. हा कक्ष २४ तास सुरू ठेवण्याचे निर्देश महापौरांनी दिले. तसेच आयुष्मान कार्डधारक रुग्णांकडून आवश्यकतेपेक्षा अधिक कागदपत्रांची मागणी करू नये, अशी स्पष्ट सूचना करण्यात आली.

रुग्णालयातील औषधे रुग्णांना वेळेवर उपलब्ध करून द्यावीत, औषधांच्या उपलब्धतेबाबत कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, याची दक्षता घेण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले.

रुग्णालयातील सर्व विभागांमध्ये स्वच्छता चांगल्या पद्धतीने राखावी, रुग्णांच्या परिसरात अस्वच्छता आढळू नये आणि रुग्णांना स्वच्छ व सुरक्षित वातावरण मिळेल याची काळजी घ्यावी, असेही महापौरांनी सांगितले.

रुग्णांशी डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांनी आपुलकीने आणि संवेदनशीलतेने संवाद साधावा, अशी सूचनाही त्यांनी केली. रुग्णांना मिळणाऱ्या वैद्यकीय सेवांबाबत नियमितपणे माहिती घेण्यावर त्यांनी भर दिला.

रुग्णालयातील आहाराची गुणवत्ता तपासताना महापौरांनी स्वतः रुग्णांना देण्यात येणारा आहार पाहिला. आहाराचा दर्जा तत्काळ सुधारण्याचे निर्देश त्यांनी संबंधित प्रशासनाला दिले.

याशिवाय रुग्णालयासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ, वैद्यकीय सुविधा आणि उपकरणांबाबतचा तपशील प्रशासनाने सादर करावा, अशी सूचना करण्यात आली.

दुसऱ्या मजल्यावरील डीएसए कॅथलॅबमधील मज्जातंतू शस्त्रक्रिया विभागाचीही महापौरांनी पाहणी केली. या विभागासाठी पूर्णवेळ डॉक्टर आणि आवश्यक वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कंत्राटी कर्मचारी आणि कंत्राटी डॉक्टरांनी मांडलेल्या समस्यांबाबतही महापौरांनी सकारात्मक भूमिका घेतली. त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी महापालिका प्रशासनासोबत संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

महापौरांच्या या आकस्मिक पाहणीमुळे रुग्णालयातील सेवा, सुविधा आणि प्रशासनाच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS