
मुंबई | JPN NEWS : कर्करोगासारख्या दुर्धर आजाराशी लढा देणाऱ्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे क्षण फुलवण्यासाठी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी माहीम येथील रोनाल्ड मॅकडोनाल्ड हाऊस इंडिया येथे मुलांसोबत रक्षाबंधन साजरे केले. उपचारांच्या कठीण प्रवासात असलेल्या बालरुग्णांसोबत महापौरांनी मनमोकळ्या गप्पा मारत त्यांना भेटवस्तू दिल्या आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.
२७ ऑगस्ट रोजी झालेल्या या विशेष सोहळ्यात किमोथेरपी आणि इतर वैद्यकीय उपचारांचा सामना करणाऱ्या मुलांनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या राख्या महापौरांना बांधल्या. या हृदयस्पर्शी प्रसंगामुळे उपस्थित पालक आणि डॉक्टरही भावूक झाले.
यावेळी महापौर रितू तावडे यांनी मुलांना मायेने जवळ घेत त्यांचा उत्साह वाढवला. “तुम्ही या लढाईत एकटे नाही, संपूर्ण मुंबई तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे,” असा विश्वास त्यांनी बालरुग्णांना दिला.
रोनाल्ड मॅकडोनाल्ड हाऊस इंडिया संस्थेकडून गंभीर आजारांवर उपचार घेण्यासाठी मुंबईत येणाऱ्या मुलांच्या कुटुंबांना निवास आणि भोजनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. दूरवरच्या भागातून उपचारांसाठी येणाऱ्या कुटुंबांना या सुविधेमुळे मोठा आधार मिळतो. माहीम येथील संस्थेच्या वास्तूतील सुसज्ज खोल्या आणि स्वयंपाकघराचीही महापौरांनी पाहणी केली.
गरजू कुटुंबांना आर्थिक मदतीचे आश्वासन
कर्करोगाशी लढणाऱ्या गरजू बालरुग्णांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी महापौर वैद्यकीय मदत कक्षामार्फत तत्काळ आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही महापौरांनी दिले. यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश त्यांनी संस्थेच्या संचालकांना दिले.
“कर्करोगाच्या उपचारांच्या वेदना सहन करणाऱ्या या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर राखीचा आनंद आणि जगण्याची जिद्द पाहून आपण भारावून गेलो,” अशा भावना महापौरांनी व्यक्त केल्या.
महापौरांच्या या आत्मीय भेटीमुळे बालरुग्णांसह त्यांच्या कुटुंबीयांनाही मानसिक आणि भावनिक आधार मिळाला. यावेळी रोनाल्ड मॅकडोनाल्ड हाऊस इंडियाचे संचालक निशेत पांडे, सुलक्षणा मुखर्जी, संस्थेचे कर्मचारी तसेच बालरुग्णांचे कुटुंबीय उपस्थित होते.


No comments:
Post a Comment