पालिका कर्मचारी-अधिकाऱ्यांना संजय जाधव कायम स्मरणात राहतील - डॉ. संजय बापेरकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 August 2026

पालिका कर्मचारी-अधिकाऱ्यांना संजय जाधव कायम स्मरणात राहतील - डॉ. संजय बापेरकर


मुंबई JPN NEWS - मुंबई महानगरपालिकेचे माजी प्रमुख अभियंता आणि फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतील विचारवंत दिवंगत संजय महादेव जाधव यांच्या पुण्यानुमोदन व श्रद्धांजली सभेचे आयोजन दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या सामाजिक, धार्मिक आणि प्रशासकीय योगदानाला उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

८ ऑगस्ट रोजी दुर्धर आजाराने संजय जाधव यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने सामाजिक आणि पालिका क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात आली.

श्रद्धांजली सभेत कामगार नेते डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी संजय जाधव यांच्या कार्याचा गौरव केला. अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेचे संजय जाधव यांनी पालिकेत अभियंता म्हणून काम करताना अनेक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या अडचणीच्या काळात मदतीचा हात दिला. त्यामुळे पालिका कर्मचारी आणि अधिकारी त्यांना कायम स्मरणात ठेवतील, असे डॉ. बापेरकर यांनी सांगितले.

पालिका अधिकाऱ्यांसाठीच्या ‘ऋणानुबंध अभियान’ तसेच पालिकेतील पहिली मान्यताप्राप्त मागासवर्गीय संघटना BMC SC/ST/VJNT/OBC Employees Association च्या स्थापनेत संजय जाधव यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते.

‘बौद्धजन पंचायत समिती’च्या इमारतीच्या बांधकामाला पालिकेची परवानगी मिळवून देण्यासाठी संजय जाधव यांनी मोलाची भूमिका बजावली, असे पंचायत समितीचे कार्याध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले.

दापोली विभागात ‘बौद्ध मेडिटेशन सेंटर’ उभारण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला, अशी माहिती ‘ऋणानुबंध अभियान’चे माजी अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी दिली.

यावेळी माजी अभियंता सत्यप्रकाश सिंह, सहाय्यक अभियंता प्रशांत जगताप, तेलुगू टीमचे प्रमुख नागसेन मालाजी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिवंगत संजय जाधव यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे आणि सहकार्याच्या वृत्तीचे स्मरण करत उपस्थितांनी त्यांच्या कार्याला अभिवादन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS