वडाळ्यात पैशांच्या मागणीला विरोध केल्याने तरुणाची चाकू भोसकून हत्या - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 August 2026

वडाळ्यात पैशांच्या मागणीला विरोध केल्याने तरुणाची चाकू भोसकून हत्या


मुंबई JPN NEWS - वडाळा पूर्वेतील शांतीनगर परिसरात पैशांची मागणी करण्यास विरोध केल्याच्या कारणावरून तिघांनी एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी वडाळा टी.टी. पोलिसांनी तिघांना अटक केली असून, त्यांच्याविरोधात हत्येसह दरोड्याच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ३० ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे १.३० वाजता जय भवानी माता मंदिराजवळील सार्वजनिक शौचालय परिसरात घडली. मृत व्यक्तीचे नाव सुरेश यादव असे आहे.

सुरेश यादव यांना परिसरात राहणाऱ्या तीन आरोपींनी कथितरित्या अडवून जबरदस्तीने पैशांची मागणी केली. यादव यांनी पैसे देण्यास विरोध केल्यानंतर आरोपी क्रमांक २ आणि ३ यांनी त्यांचे हात पकडून ठेवले. त्याचवेळी आरोपी क्रमांक १ याने हातातील चाकूने यादव यांच्या पोटात वार केल्याचा आरोप आहे.

चाकूच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या यादव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हल्ल्यानंतर आरोपींनी यादव यांच्याकडील मोबाईल फोनही काढून घेतल्याचे पोलिस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी फिर्यादी मनोज रामदयाल जैयस्वाल यांच्या तक्रारीवरून वडाळा टी.टी. पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५७४/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), ३०९(६), ३(५) तसेच फौजदारी कायदा (सुधारणा) अधिनियम १९३२ मधील कलम ७ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तिघा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, हत्येमागील नेमके कारण आणि घटनेतील इतर बाबींचा पुढील तपास वडाळा टी.टी. पोलीस करत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS