
मुंबई JPN NEWS - जोगेश्वरी पश्चिम परिसरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या आझाद मैदान युनिटने अटक केली आहे. आरोपीकडून ४१७ ग्रॅम एमडी आणि २.०४ ग्रॅम एमडीएमएच्या तीन गोळ्या, तसेच रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण १ कोटी २६ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे पथक ११ सप्टेंबर रोजी जोगेश्वरी परिसरात गस्त घालत असताना एका व्यक्तीकडून त्याच्या राहत्या घरातून अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने संबंधित व्यक्तीच्या घरावर छापा टाकला.
कारवाईदरम्यान आरोपीच्या अंगझडतीत २.०४ ग्रॅम वजनाच्या तीन एमडीएमए गोळ्या, २१० ग्रॅम एमडी आणि आयफोन-१५ असा मुद्देमाल आढळून आला. त्यानंतर घराची झडती घेतली असता आणखी २०७ ग्रॅम एमडी आणि २५ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या एमडीची एकूण किंमत सुमारे १ कोटी २५ लाख १० हजार रुपये, तर एमडीएमए गोळ्यांची किंमत ८८ हजार रुपये आहे. मोबाईलची किंमत सुमारे २० हजार रुपये असून, रोकड २५ हजार रुपये आहे.
या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या आझाद मैदान युनिटने गुन्हा क्रमांक ८५/२०२६ दाखल केला असून, एनडीपीएस कायद्यातील संबंधित कलमांनुसार आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांचा पुरवठा कुठून होत होता आणि या तस्करीत आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी आणि सहायक पोलीस आयुक्त सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. आझाद मैदान युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक शैलेश सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.


No comments:
Post a Comment