
मुंबई JPN NEWS - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविवारी, १३ सप्टेंबर रोजी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे–कल्याणदरम्यान धीम्या मार्गावर तसेच ट्रान्स-हार्बर मार्गावर अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यात येणार असल्याने लोकल सेवांवर परिणाम होणार आहे. मात्र, गणेशोत्सव लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर १३ सप्टेंबरला नियमित जम्बो ब्लॉक घेण्यात येणार नाही, त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
ठाणे–कल्याण धीम्या मार्गावर पाच तासांचा ब्लॉक
मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर ठाणे आणि कल्याणदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल.
या कालावधीत मुलुंडहून सकाळी १०.४३ ते दुपारी ३.५३ दरम्यान सुटणाऱ्या डाऊन धीम्या/अर्धजलद लोकल मुलुंड ते कल्याणदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आणि डोंबिवली येथे थांबतील. त्यामुळे त्या आपल्या गंतव्यस्थानी सुमारे १० मिनिटे उशिराने पोहोचतील.
त्याचप्रमाणे कल्याणहून सकाळी १०.३६ ते दुपारी ३.५१ दरम्यान सुटणाऱ्या अप धीम्या/अर्धजलद लोकल कल्याण ते मुलुंडदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्यांना डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे येथे थांबा देण्यात येईल. त्यानंतर मुलुंड येथे त्या पुन्हा धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सकाळी ११ ते सायंकाळी ५ या कालावधीत सुटणाऱ्या तसेच तेथे येणाऱ्या अप-डाऊन धीम्या लोकल सुमारे १० मिनिटे उशिराने धावण्याची शक्यता आहे.
ट्रान्स-हार्बर सेवा बंद
ठाणे–वाशी/नेरुळदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.
या कालावधीत ठाणे–वाशी/नेरुळ/पनवेलदरम्यानच्या ट्रान्स-हार्बर लोकल सेवा बंद राहतील. ठाण्याहून सकाळी १०.३५ ते सायंकाळी ४.०७ या वेळेत वाशी/नेरुळ/पनवेलकडे जाणाऱ्या तसेच पनवेल/नेरुळ/वाशीहून सकाळी १०.२५ ते सायंकाळी ४.०९ या कालावधीत ठाण्याकडे येणाऱ्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.
मात्र बेलापूर–उरण मार्गावरील लोकल रविवारच्या वेळापत्रकानुसार सुरू राहतील.
पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने १३ सप्टेंबर रोजी उपनगरीय मार्गावर जम्बो ब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरीय मार्गावरील प्रवाशांना रविवारी नेहमीच्या रविवारच्या मेगाब्लॉकमुळे होणारा त्रास होणार नाही.
मध्य रेल्वेने प्रवाशांना ब्लॉकच्या वेळा लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने हे ब्लॉक आवश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


No comments:
Post a Comment