मुंबई JPN NEWS - विवाह प्रमाणपत्र देण्यासाठी शासकीय शुल्काव्यतिरिक्त दोन हजार रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून मुंबई महापालिकेच्या के/पश्चिम विभागातील आरोग्य खात्यातील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. स्वप्नील गोविंद म्हात्रे (४९) असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
एसीबीकडे प्राप्त तक्रारीनुसार, २४ वर्षीय तक्रारदार विवाह प्रमाणपत्र मिळविण्यासाठी के/पश्चिम वॉर्डच्या आरोग्य विभागात गेले होते. त्यावेळी विवाह प्रमाणपत्र देण्यासाठी शासकीय शुल्काव्यतिरिक्त सुरुवातीला १,५०० रुपयांची लाच मागण्यात आल्याचा आरोप आहे. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने ८ सप्टेंबर रोजी मुंबई एसीबीकडे तक्रार दाखल केली.
या तक्रारीची एसीबीने पडताळणी केली. ८ सप्टेंबर रोजी झालेल्या पडताळणीदरम्यान संबंधित लोकसेवकाने तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याचे एसीबीने नमूद केले आहे.
त्यानंतर ९ सप्टेंबर रोजी एसीबीने सापळा रचला. के/पश्चिम वॉर्डच्या आरोग्य विभागाच्या कार्यालयात तक्रारदाराकडून दोन हजार रुपये स्वीकारताना स्वप्नील म्हात्रे यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
कारवाईदरम्यान आरोपीची अंगझडती घेण्यात आली असून, त्यांच्याकडील एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. म्हात्रे यांना ९ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३४ वाजता ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एसीबीने दिली आहे. पुढील तपास सुरू आहे.


No comments:
Post a Comment