मॅनहोल दुर्घटनेतील मृत असलम शेख यांच्या कुटुंबातील एकाला पालिकेत नोकरी; २५ लाखांची मदत देण्याची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 September 2026

मॅनहोल दुर्घटनेतील मृत असलम शेख यांच्या कुटुंबातील एकाला पालिकेत नोकरी; २५ लाखांची मदत देण्याची मागणी


मुंबई JPN NEWS - कुर्ला येथील खैराणी मार्ग परिसरातील मॅनहोल दुर्घटनेत मृत्यू झालेल्या असलम शेख यांच्या कुटुंबाला कायमस्वरूपी आधार मिळावा, यासाठी कुटुंबातील एका सदस्याला विशेष बाब म्हणून मुंबई महापालिकेत नोकरी देण्यात यावी, तसेच २५ लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेस गटनेते अशरफ आझमी यांनी स्थायी समितीत केली.

स्थायी समितीच्या बैठकीत आझमी यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे असलम शेख यांच्या मृत्यूचा विषय उपस्थित केला. साकीनाका येथील यादवनगर परिसरात राहणारे असलम शेख यांचा खैराणी मार्गावरील मॅनहोल दुर्घटनेत मृत्यू झाला होता. कुटुंबातील कर्ता पुरुष गमावल्याने शेख कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले असल्याचे आझमी यांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर कुटुंबातील एका सदस्याला महापालिकेत नोकरी देऊन कुटुंबाला कायमस्वरूपी आर्थिक आधार द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. त्यांच्या या मागणीला सभागृह नेते गणेश खनकर यांनी तत्काळ पाठिंबा दर्शविला. स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनीही या मागणीला सहमती दर्शविल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, शेख कुटुंबाला यापूर्वी महापालिकेकडून १० लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाल्याची माहिती देण्यात आली. मात्र, कुटुंबाचा दीर्घकालीन उदरनिर्वाहाचा प्रश्न लक्षात घेता नोकरीची मागणी करण्यात आली आहे.

कुटुंबातील एका सदस्याला महापालिकेत नोकरी देण्याच्या मागणीला सत्ताधारी आणि विरोधकांकडून पाठिंबा मिळाल्याने या प्रकरणात सर्वपक्षीय सहमतीचे चित्र निर्माण झाले आहे. आता प्रशासनाकडून याबाबत कोणता निर्णय घेतला जातो, याकडे शेख कुटुंबासह स्थानिकांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS