२८९८ सिमकार्ड, १० बँक खाती अन् २४ कोटींची फसवणूक; मुंबईत तिघांना अटक - JPN NEWS 2.

Post Top Ad

२८९८ सिमकार्ड, १० बँक खाती अन् २४ कोटींची फसवणूक; मुंबईत तिघांना अटक

Share This

मुंबई JPN NEWS - विविध बँक खाती आणि हजारो मोबाईल सिमकार्डचा वापर करून ऑनलाइन सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष-५ने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली असून, आरोपींकडून ८८ पासबुक, १४३ चेकबुक, १०० एटीएम कार्ड, २४ मोबाईल फोन, १६७ सिमकार्ड आणि दोन लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत.

गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या कक्ष-५च्या पथकाने संशयित तिघांना ताब्यात घेतले. चौकशी आणि तांत्रिक तपासात ऑनलाइन सायबर फसवणुकीचे धागेदोरे समोर आल्यानंतर मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मालाड पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक १४९६/२०२६नुसार भारतीय न्याय संहितेतील कलम ३१८(४), ६१, ४५, ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम ६६(ड) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

१० बँक खात्यांतून २४ कोटींचे व्यवहार - 
तपासात आरोपींनी स्वतःच्या तसेच इतर व्यक्तींच्या नावावर विविध बँकांमध्ये खाती उघडल्याचे निष्पन्न झाले. संबंधित खात्यांना सिमकार्ड जोडून त्यांचा सायबर फसवणुकीसाठी वापर करण्यात येत असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

आतापर्यंत तपासात १० बँक खात्यांमधून सुमारे २४ कोटी रुपयांची सायबर फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या खात्यांशी संबंधित ३२ तक्रारी राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन १९३०च्या पोर्टलवर नोंद असल्याचेही तपासात आढळले आहे.

तब्बल २,८९८ सिमकार्डचा वापर - 
तांत्रिक तपासात आरोपींनी वेगवेगळ्या टप्प्यांवर तब्बल २,८९८ सिमकार्डचा वापर केल्याचे समोर आले आहे. त्यापैकी १६७ सिमकार्ड पोलिसांनी प्रत्यक्ष कारवाईत जप्त केले आहेत. या सिमकार्डचा वापर कोणत्या प्रकारच्या सायबर गुन्ह्यांसाठी करण्यात आला आणि त्यांचा आणखी किती बँक खात्यांशी संबंध आहे, याचा तपास सुरू आहे.

१९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी - 
अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना १९ सप्टेंबर २०२६पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरोपींचे आर्थिक व्यवहार, बँक खाती, सिमकार्ड तसेच या रॅकेटमधील इतर संभाव्य साथीदारांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास करण्यात येत आहे.

ही कारवाई मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन आणि सहायक पोलीस आयुक्त सदानंद राणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कक्ष-५च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोहिणी पोतदार, पोलीस निरीक्षक रविंद्र तेलतुंबडे यांच्यासह गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS JPN NEWS

Pages