लोअर परळमध्ये उकळत्या तेलाच्या कढईत पडून पाच वर्षांची चिमुकली गंभीर भाजली; दोघांना अटक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 September 2026

लोअर परळमध्ये उकळत्या तेलाच्या कढईत पडून पाच वर्षांची चिमुकली गंभीर भाजली; दोघांना अटक


मुंबई JPN NEWS - लोअर परळ परिसरात फुटपाथवर लावलेल्या मन्चुरियनच्या स्टॉलजवळ उकळत्या तेलाच्या कढईत पडून पाच वर्षांची चिमुकली गंभीररीत्या भाजल्याची घटना १४ सप्टेंबर रोजी घडली. या प्रकरणी एन. एम. जोशी मार्ग पोलिसांनी स्टॉलचालक असलेल्या दोघांना अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदेश श्रीराम पाल आणि लालजी नंदकुमार पाल हे दोघे लोअर परळमधील फुटपाथवर मन्चुरियनचा स्टॉल चालवत होते. त्यांनी पादचाऱ्यांच्या मार्गावरच उकळत्या तेलाने भरलेली लोखंडी कढई ठेवली होती, असा आरोप आहे. 

१४ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास पाच वर्षांची मुलगी मन्चुरियन घेण्यासाठी स्टॉलजवळ गेली. यावेळी ती अचानक उकळत्या तेलाच्या कढईत पडली. तिच्या किंकाळ्या ऐकून वडील आणि नागरिकांनी धाव घेत तिला बाहेर काढले. त्यानंतर तिला तातडीने पोदार रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर तिला नायर रुग्णालयात हलवण्यात आले आणि पुढील उपचारासाठी मसिना रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

घटनेची माहिती मिळताच एन. एम. जोशी मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी लोखंडी कढईसह स्टॉलवरील इतर साहित्य जप्त केले आहे. फुटपाथवर गॅस शेगडीचा वापर करून उकळते तेल ठेवून स्टॉल चालवताना सुरक्षिततेची काळजी घेतली नसल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 125(b) आणि 287 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. 

फुटपाथवरील खाद्यपदार्थांच्या स्टॉलमध्ये सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास पादचारी आणि विशेषतः लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, हे या घटनेतून समोर आले आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS