
मुंबई JPN NEWS - जन्म-मृत्यू नोंदवहीतील नोंदींमध्ये दुरुस्ती करण्यासह नोंद रद्द करण्याच्या प्रक्रियेसाठी महाराष्ट्र शासनाने सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यापुढे मुख्य निबंधकांच्या मंजुरीशिवाय जन्म किंवा मृत्यूची कोणतीही नोंद रद्द करता येणार नाही.
आरोग्य सेवा संचालनालय आणि जन्म-मृत्यूचे मुख्य निबंधक यांच्या माध्यमातून ही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीचा लेखी अर्ज घेणे तसेच सादर केलेल्या मूळ कागदपत्रांची पडताळणी करणे आवश्यक करण्यात आले आहे.
जन्म-मृत्यूच्या नोंदीमध्ये केवळ शुद्धलेखन किंवा लेखनातील त्रुटी असल्यास आवश्यक पुराव्यांच्या आधारे दुरुस्ती करता येणार आहे. मात्र, मूळ नोंदीत फेरफार न करता संबंधित बदलाची नोंद ‘शेरा’ स्तंभात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पालकांचा घटस्फोट झाला तरी वडिलांचे नाव हटवता येणार नाही -
जन्म नोंदणी झाल्यानंतर मुलाचे नाव ठेवले किंवा त्यामध्ये बदल केला असल्यास मूळ जन्म नोंदीत थेट बदल करण्याऐवजी ते नाव ‘अलियास’ (ऊर्फ) स्वरूपात नोंदवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच पालकांचा घटस्फोट झाल्याच्या कारणावरून जन्म दाखल्यातून वडिलांचे नाव काढून टाकता येणार नसल्याचे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच व्यक्तीच्या जन्मानंतर किंवा मृत्यूनंतर पत्ता बदलला असल्यास नंतरचा बदललेला पत्ता जन्म किंवा मृत्यूच्या दाखल्यात समाविष्ट करता येणार नाही.
फसवणुकीच्या नोंदी रद्द करण्याची स्वतंत्र प्रक्रिया -
जन्म किंवा मृत्यूची मूळ नोंद फसवणुकीने अथवा चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित प्रकरणाचा प्रस्ताव जिल्हा निबंधकांमार्फत मुख्य निबंधकांकडे पाठवावा लागणार आहे. मुख्य निबंधकांचा आदेश प्राप्त झाल्यानंतरच सीआरएस (Civil Registration System) पोर्टलवरील संबंधित नोंद रद्द करता येणार आहे. त्यामुळे जन्म-मृत्यूच्या नोंदींमध्ये दुरुस्ती अथवा रद्दबातल करताना आता कागदपत्रांची पडताळणी आणि अधिकृत मंजुरीची प्रक्रिया काटेकोरपणे पाळावी लागणार आहे.


No comments:
Post a Comment