अरबी समुद्रात ५ पाकिस्तानी नागरिकांना अटक, ३ हजार कोटींचे ५२६ किलो ड्रग्स जप्त - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 September 2026

अरबी समुद्रात ५ पाकिस्तानी नागरिकांना अटक, ३ हजार कोटींचे ५२६ किलो ड्रग्स जप्त


मुंबई JPN NEWS - अमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय तस्करीविरोधात भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने अरबी समुद्रात मोठी कारवाई केली आहे. संयुक्त कारवाईदरम्यान संशयास्पद इराणी बोट अडवून तिची झडती घेतली असता तब्बल ५२६ किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले. या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ३,००० कोटी रुपयांहून अधिक असल्याचा अंदाज तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

या कारवाईत बोटीवर सवार असलेल्या पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांमध्ये हेरॉईन आणि मेथॅम्फेटामाईनचा समावेश असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.

संशयास्पद बोटीवर पाळत - 
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसच्या पथकाने अरबी समुद्रातील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवले होते. यावेळी संशयास्पद बोट आढळल्यानंतर सुरक्षा पथकाने ती अडवून तिची तपासणी केली.

तलाशीदरम्यान बोटीत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ आढळून आले. त्यानंतर बोटीवरील पाच पाकिस्तानी नागरिकांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

भारतात आणण्याचा प्रयत्न? - 
प्राथमिक माहितीनुसार, सागरी मार्गाने अमली पदार्थांची ही खेप भारतात आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. मात्र ही खेप नेमकी कुठून आणण्यात आली होती, भारतातील कोणत्या ठिकाणी पोहोचवली जाणार होती आणि या तस्करीमागे कोणते नेटवर्क कार्यरत आहे, याचा तपास सुरू आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी करून या तस्करीच्या संपूर्ण साखळीचा शोध घेण्याचा प्रयत्न तपास यंत्रणांकडून केला जात आहे. या नेटवर्कमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, तसेच या अमली पदार्थांचा अंतिम ठावठिकाणा कोणता होता, याची माहितीही तपासातून समोर येण्याची शक्यता आहे.

जप्त करण्यात आलेले अमली पदार्थ आणि बोट पुढील कायदेशीर कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, तपास पूर्ण झाल्यानंतर अमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित अधिक माहिती स्पष्ट होणार आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS