विक्रोळीत मेट्रोच्या कामातील बॅरिकेड अंगावर कोसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 September 2026

विक्रोळीत मेट्रोच्या कामातील बॅरिकेड अंगावर कोसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू


मुंबई JPN NEWS - विक्रोळीतील एल.बी.एस. रोडवर मेट्रोच्या कामासाठी उभारण्यात आलेले लोखंडी बॅरिकेड दुचाकीस्वाराच्या अंगावर कोसळल्याने ५४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. शुक्रवारी (१८ सप्टेंबर) दुपारी घडलेल्या या दुर्घटनेप्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी मेट्रोचे काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीसह सुपरवायझर आणि व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मृत व्यक्तीचे नाव वसीम हैदर असून ते घाटकोपर पश्चिम येथील रहिवासी होते. शुक्रवारी दुपारी कामानिमित्त ते दुचाकीवरून मुलुंडच्या दिशेने जात होते. त्यांची दुचाकी एमएच ०३ सीवाय ०७५१ क्रमांकाची होती.

वसीम हैदर हे एल.बी.एस. रोडवरील रोझरी बायोटेक इमारतीसमोरून जात असताना रस्त्यालगत उभारण्यात आलेले लोखंडी बॅरिकेड अचानक त्यांच्या अंगावर कोसळले. या दुर्घटनेत ते गंभीर जखमी झाले. स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.

कंत्राटदारासह तिघांविरोधात गुन्हा -
या घटनेनंतर वसीम हैदर यांच्या मुलाने पार्कसाईट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मेट्रोचे काम करणारी संबंधित कंत्राटदार कंपनी, सुपरवायझर आणि व्यवस्थापक यांच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानुसार पोलिसांनी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे.

दरम्यान, मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेसाठी उभारण्यात येणाऱ्या बॅरिकेड्सची सुरक्षितता, त्यांची बांधणी आणि देखरेख याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. या दुर्घटनेची नेमकी कारणे आणि सुरक्षाव्यवस्थेत काही त्रुटी होत्या का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

मेट्रोच्या कामादरम्यान अपघातांची मालिका -
मुंबईत मेट्रोच्या बांधकामादरम्यान यापूर्वीही दुर्घटना घडल्या आहेत. १४ फेब्रुवारी रोजी मुलुंडमधील एल.बी.एस. रोडवर मेट्रोचा पॅरापेट स्लॅब कोसळून रिक्षा आणि कारचे नुकसान झाले होते. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू, तर तीन जण जखमी झाले होते.

त्यानंतर १२ सप्टेंबर रोजी वडाळ्यातील भक्ती पार्क मेट्रो स्थानकाच्या बांधकामादरम्यान लोखंडी मचाण कोसळल्याने दोन कामगारांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर विक्रोळीतील ताज्या दुर्घटनेमुळे मेट्रोच्या बांधकामस्थळी सुरक्षाव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS