काळाचौकीत गणेशोत्सव मंडपाजवळ विजेचा धक्का; दोन मुलींचा मृत्यू, चार जखमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 September 2026

काळाचौकीत गणेशोत्सव मंडपाजवळ विजेचा धक्का; दोन मुलींचा मृत्यू, चार जखमी


मुंबई JPN NEWS - काळाचौकीतील दत्ताराम लाड मार्गावर गणेशोत्सव मंडळाच्या प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या पाणीवाटप केंद्राजवळ वीजप्रवाह उतरल्याने सहा जणांना विजेचा धक्का बसल्याची घटना रविवारी पहाटे घडली. या दुर्घटनेत दोन मुलींचा मृत्यू झाला असून, चार जण जखमी आहेत. त्यापैकी एका १२ वर्षीय मुलीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

मुंबई अग्निशमन दलाला (MFB) २० सप्टेंबर रोजी पहाटे २.४२ वाजता या घटनेची माहिती मिळाली. महागणपती उत्सव मंडळाच्या प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या पाणीवाटप केंद्राजवळ वीजप्रवाह असल्याचे निदर्शनास आले. खबरदारी म्हणून तत्काळ वीजपुरवठा बंद करण्यात आला आणि परिसराला सुरक्षिततेच्या दृष्टीने घेराव घालण्यात आला.

या घटनेत जखमी झालेल्या सहा जणांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी राघिनी घनश्याम यादव (८) आणि सुजाता (३३) यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले.

मसिना रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या किरण अकबर नाईक (१९), तन्वी नरेश हांडे (१९) आणि साहिल संदीप तारे (१९) यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर रुही सिंह (१२) हिला ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर आहे. ती आयसीयूमध्ये उपचार घेत आहे.

BEST कडून घटनास्थळाची पाहणी - 
घटनेची माहिती मिळाल्यानंतर BESTच्या अधिकाऱ्यांनी दत्ताराम लाड मार्गावरील दिग्विजय मिल चाळ, पोल क्रमांक DLM-14 येथे घटनास्थळाची पाहणी केली. गणपती उत्सवातील रोषणाई आणि शीतपेय विक्रीच्या स्टॉलसाठी बसविण्यात आलेल्या तात्पुरत्या मीटर क्रमांक M217392 चीही तपासणी करण्यात आली.

BESTच्या माहितीनुसार, स्थानिक इलेक्ट्रिशियनने तात्पुरत्या मीटरची वायरिंग आणि MCB आधीच डिस्कनेक्ट केली होती. घटनास्थळावरील वीजपुरवठाही अंशतः बंद ठेवण्यात आला होता. BESTचा फ्यूजमन घटनास्थळी उपस्थित होता.

पोलिसांकडून तपास सुरू - 
काळाचौकी पोलिसांनीही घटनास्थळी पाहणी केली असून मीटर इन्स्पेक्टरला तपासणीसाठी बोलावण्यात आले आहे. वीजप्रवाह नेमका कुठून आला आणि तात्पुरत्या पाणीवाटप केंद्रातील विद्युत जोडणीमध्ये काही त्रुटी होती का, याचा तपास सुरू आहे.

गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असताना मंडप परिसरातील तात्पुरत्या विद्युत जोडण्या, पाणीवाटप केंद्रे आणि इतर सुविधांच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे ऐरणीवर आला आहे. स्थानिक पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS