
मुंबई JPN NEWS - ‘रागाने का पाहतोस?’ या गैरसमजातून सुरू झालेल्या किरकोळ वादाचा शेवट रक्तरंजित हत्येत झाला. घाटकोपर पूर्वेतील कामराज नगर परिसरात गणपती मंडळाच्या अध्यक्षावर चाकूने हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेत मंडळाचा एक कार्यकर्ताही जखमी झाला आहे. पंतनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून सात आरोपींना अटक केली आहे.
ही घटना १८ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री साडेनऊ ते पावणे दहा वाजण्याच्या दरम्यान, बीएमसी शाळेजवळ सेव्हन स्टार स्पोर्ट्स क्लब गणपती मंडळासमोर, कामराज नगर येथे घडली. मृताचे नाव राजेश राजेंद्रन देवेंदर (३५) असून ते लॅबमध्ये नोकरी करत होते. तसेच ते सेव्हन स्टार स्पोर्ट्स क्लब गणपती मंडळाचे अध्यक्ष होते.
‘रागाने पाहिल्या’चा गैरसमज अन् तरुणाला चापट -
पोलिसांच्या तक्रारीनुसार, मंडळाचा कार्यकर्ता विनय शर्मा (१८) हा घटनास्थळी असताना आरोपी रौनक बाळू सोनवणे याने विनय आपल्याकडे रागाने पाहत असल्याचा गैरसमज केला. त्यातून रौनकने विनयच्या कानाखाली चापट मारली. विनयला मारहाण केल्याची माहिती मिळाल्यानंतर मंडळाचे अध्यक्ष राजेश देवेंदर यांनी घटनास्थळी जाऊन रौनकला याबाबत जाब विचारला. त्यावेळी दोन्ही बाजूंमध्ये वाद वाढला.
वाद वाढला आणि चाकूने हल्ला -
जाब विचारल्यानंतर रौनक बाळू सोनवणे, आकाश सुभाष सोनवणे आणि अन्य आरोपी एकत्र आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. वाद वाढल्यानंतर रौनक सोनवणे याने राजेश देवेंदर यांच्या छातीच्या डाव्या बाजूला चाकूने वार केल्याचा आरोप आहे. चाकूचा वार झाल्याने राजेश गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
साक्षीदारावरही चाकूने वार -
हल्ल्यादरम्यान आनंद तिवारी यांच्या कमरेवरही चाकूने वार करून त्यांना जखमी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. आरोपींनी राजेश आणि आनंद यांना हाताने मारहाण केली तसेच शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचा आरोप आहे.
पहाटे गुन्हा दाखल; सात जण अटकेत -
या घटनेप्रकरणी पंतनगर पोलिसांनी १९ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४.३९ वाजता गुन्हा दाखल केला. भारतीय न्याय संहितेतील खून, दुखापत, मारहाण, धमकी तसेच बेकायदेशीर जमावासंबंधी विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी रौनक बाळू सोनवणे (३५), आकाश सुभाष सोनवणे (२८), अश्विन गणेश उनवणे (२३), श्रेयस अजय शुक्ला (२०), बबलू आणि स्टीफन सेगल नाडर उर्फ अण्णा (२३) यांच्यासह सात आरोपींना अटक केली आहे.
गणेशोत्सवाशी संबंधित वाद नसल्याचे पोलिसांचे स्पष्टीकरण -
दरम्यान, या घटनेला गणेशोत्सवाचा किंवा गणपती मंडळातील अंतर्गत वादाचा रंग देणे योग्य नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. ही घटना गणपती मंडळाच्या अंतर्गत वादातून किंवा गणेशोत्सवाच्या कारणावरून घडलेली नसून, ‘रागाने पाहिल्या’च्या गैरसमजातून सुरू झालेल्या वादातून घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
या हत्येमुळे कामराज नगर परिसरात खळबळ उडाली असून, घटनेमागील नेमकी परिस्थिती आणि आरोपींची भूमिका याबाबत पंतनगर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


No comments:
Post a Comment