
मुंबई JPN NEWS - महाराष्ट्रातील कुशल बांधकाम कामगारांसाठी आंतरराष्ट्रीय रोजगाराचे नवे दालन खुले झाले असून, १०३ निवड झालेल्या कामगारांपैकी ६० जणांची पहिली तुकडी ३ सप्टेंबर २०२६ रोजी इस्रायलला रवाना होणार आहे. उर्वरित कामगारांना टप्प्याटप्प्याने इस्रायलमध्ये रोजगारासाठी पाठविण्यात येणार आहे. इस्रायलमध्ये या कामगारांना दरमहा सुमारे दोन लाख रुपये वेतन, वैद्यकीय सुविधा आणि शासकीय स्तरावरील सुरक्षित रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.
यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ‘महाराष्ट्राची कौशल्यशक्ती आता जगभर’ या उपक्रमांतर्गत इस्रायलला रवाना होणाऱ्या कुशल बांधकाम कामगारांशी मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी युवकांनी कठोर परिश्रम करून आपल्या कुटुंबासह महाराष्ट्राचा आणि देशाचा नावलौकिक वाढवावा, तसेच भारतीय संस्कृतीचा आदर राखत शिस्त, प्रामाणिकपणा आणि व्यावसायिकता जपावी, असे आवाहन केले.
चार बांधकाम व्यवसायांतील कामगारांची निवड -
भारत आणि इस्रायल सरकारच्या समन्वयातून हा रोजगार उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये प्लास्टरिंग, सिरेमिक टायलिंग, बिल्डिंग फ्रेमवर्क आणि आयर्न बेंडिंग या चार व्यवसायांतील कुशल कामगारांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकृत सुमारे चार लाख कामगारांची छाननी करण्यात आली. राज्यातील १२ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून खुल्या कॅम्पस भरतीद्वारे उमेदवारांपर्यंत पोहोचण्यात आले. तसेच तीन लाखांहून अधिक कामगारांशी दूरध्वनी आणि लघुसंदेशाद्वारे संपर्क साधण्यात आला.
या प्रक्रियेत ९९७ उमेदवारांची निवड झाली. त्यानंतर वैद्यकीय तपासणी, पोलीस पडताळणी आणि इस्रायली नाव पडताळणी प्रक्रियेनंतर ७८३ उमेदवारांना अंतिम मान्यता मिळाली.
इस्रायली मानकांनुसार प्रशिक्षण -
इस्रायलमध्ये रोजगारासाठी निवडलेल्या कामगारांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले. इस्रायली प्रशिक्षकांनी २२ ते २५ जुलै २०२६ दरम्यान प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम घेतला. त्यानंतर १०३ उमेदवारांनी इस्रायली मानकांनुसार रिफ्रेशर प्रशिक्षण पूर्ण केले.
या १०३ कामगारांपैकी ६० जणांची पहिली तुकडी ३ सप्टेंबर रोजी मुंबईहून इस्रायलला रवाना होणार आहे. हे कामगार तेल अवीव येथे कार्यरत होणार आहेत.
‘कौशल्यातून आंतरराष्ट्रीय रोजगाराच्या संधी’ -
केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता, शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे महाराष्ट्रातील कामगारांचे अभिनंदन केले. इस्रायलमध्ये कुशल बांधकाम कामगारांची मोठी मागणी असून, कौशल्य विकासामुळे भारतीय तरुणांसाठी आंतरराष्ट्रीय रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC), इस्रायलचे लोकसंख्या व स्थलांतर प्राधिकरण आणि विविध राज्य सरकारांच्या सहकार्याने आतापर्यंत ६,७०० हून अधिक भारतीय कामगार इस्रायलमध्ये पाठविण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
‘विकसित महाराष्ट्र’मध्ये कौशल्य विकासाचे योगदान -
मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील ‘विकसित भारत’ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘विकसित महाराष्ट्र’ संकल्पनेत कौशल्य विकास क्षेत्राची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले.
‘मित्रा’ संस्थेने या उपक्रमात युवकांना आंतरराष्ट्रीय रोजगाराची संधी मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, २९ सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभांतर्गत राज्यभरातील एक हजार ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती लोढा यांनी दिली.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA), NSDC आणि NSDC International यांच्या समन्वयातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.


No comments:
Post a Comment