
पालघर / मुंबई JPN NEWS - डहाणू-बोरिवली मेमू ट्रेनच्या महिला डब्यात २० वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर हल्ला करून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १ ऑगस्ट रोजी पहाटे ५.१७ वाजता सुटलेल्या मेमूमध्ये तरुणी एकटीने प्रवास करीत असताना हा प्रकार घडल्याचा आरोप आहे.
महिला डब्यात २७ ते २८ वर्षांचा अज्ञात इसम घुसला. तरुणी एकटी असल्याची संधी साधून त्याने तिचा गळा दाबून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे. मात्र, तरुणीने धाडस दाखवत आरोपीच्या डोळ्यात बोटे घालून जोरदार प्रतिकार केला. तरुणीने आरडाओरड केल्यानंतर अन्य प्रवासी मदतीसाठी धावले. वाणगाव स्थानकाजवळ प्रवाशांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र झटापटीचा फायदा घेत आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला.
या घटनेमुळे पहाटेच्या वेळी महिला डब्यातील महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी पालघर जीआरपीमध्ये BNS कलम ३५४ अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे.


No comments:
Post a Comment