महापौर निवासस्थानी भक्तिभावाने बाप्पाची प्रतिष्ठापना; मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतले दर्शन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 September 2026

महापौर निवासस्थानी भक्तिभावाने बाप्पाची प्रतिष्ठापना; मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतले दर्शन


मुंबई JPN NEWS - श्रीगणेश चतुर्थीच्या पावन पर्वावर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या शासकीय निवासस्थानी आज विघ्नहर्त्या श्रीगणरायाची भक्तिभावाने प्रतिष्ठापना करण्यात आली. यानंतर सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौर निवासस्थानी भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले.

महापौर निवासस्थानी प्रतिष्ठापित करण्यात आलेली गणेशमूर्ती शाडू मातीची असून पर्यावरणपूरक आरास करण्यात आली आहे. विविध फुले आणि पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून ही आरास साकारण्यात आली आहे. दीड दिवसांच्या गणेशोत्सवासाठी बाप्पाच्या आगमनाने महापौर निवासस्थानी भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

या वर्षीच्या गणेशोत्सवाचे आणखी एक विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे महापालिका शाळेतील इयत्ता दुसरीतील विद्यार्थी रितिक पासवान याने स्वतःच्या हाताने तयार केलेली शाडू मातीची गणेशमूर्ती. रितिकने मागील आठवड्यात ही मूर्ती महापौर रितू तावडे यांना भेट दिली होती. बालकाच्या कलेचा आणि भावनेचा सन्मान करत महापौरांनी या मूर्तीचीही आपल्या निवासस्थानी प्रतिष्ठापना केली. यावेळी रितिक आणि त्याची आई उपस्थित होते. आपल्या हाताने तयार केलेल्या गणेशमूर्तीची महापौरांच्या निवासस्थानी प्रतिष्ठापना झाल्याचे पाहून रितिक आणि त्याच्या आईचा आनंद द्विगुणित झाला.

दरम्यान, सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौर निवासस्थानी भेट देत गणरायाचे दर्शन घेतले. त्यांनी श्रीगणेशाचे पूजन आणि आरती करून मुंबई आणि महाराष्ट्राच्या प्रगती, समृद्धी तसेच जनतेच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. यावेळी महापौर रितू तावडे, त्यांचे पती राजेश तावडे, सुपुत्र यश, सुकन्या अॅड. मधुरा, कुटुंबीय आणि भाविक उपस्थित होते.

गणेशोत्सवानिमित्त महापौर रितू तावडे यांनी मुंबईकरांसह महाराष्ट्रातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या. लाडक्या बाप्पाने मुंबईवर कृपादृष्टी ठेवून प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य प्रदान करावे, अशी प्रार्थना त्यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS