
मुंबई JPN NEWS - मुंबईतील १४ फूट किंवा त्यापेक्षा अधिक उंचीच्या ३९ हजार १११ झोपड्यांवर १ ऑक्टोबरपासून कारवाई होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सोमवारी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेतली. यावेळी झोपड्यांवर होणारी संभाव्य कारवाई थांबवण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, ३९ हजार १११ झोपड्यांवर कारवाई करण्याचे कोणतेही आदेश दिलेले नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.
यापूर्वी महापालिकेने १४ फूट किंवा त्यापेक्षा अधिक उंचीच्या अनधिकृत झोपड्यांची माहिती संकलित करून १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबरदरम्यान विशेष कारवाईची माहिती दिली होती. उपलब्ध माहितीनुसार मुंबई शहरातील ३,३४८, पश्चिम उपनगरातील ४,५३६ आणि पूर्व उपनगरातील ३१,२२७ अशा एकूण ३९,१११ संरचना या निकषात येतात.
आयुक्तांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, कारवाईच्या चर्चेमुळे झोपडपट्टी परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आयुक्तांनी अशा प्रकारची सरसकट कारवाई करण्याचे आदेश दिले नसल्याचे स्पष्ट केल्याने नागरिकांनी घाबरू नये, असे त्यांनी आवाहन केले.
“गरिबांच्या झोपड्यांवर हातोडा चालवला तर काँग्रेस रस्त्यावर उतरून विरोध करेल,” असा इशाराही वर्षा गायकवाड यांनी दिला.
काँग्रेसच्या शिष्टमंडळात माजी मंत्री व आमदार अस्लम शेख, आमदार डॉ. ज्योती गायकवाड, महापालिकेतील गटनेते अश्रफ आजमी, प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांच्यासह नगरसेवक सहभागी झाले होते.
वर्षा गायकवाड यांनी झोपड्यांसाठी वेगवेगळे निकष का, असा सवाल उपस्थित केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईच्या विविध भागांतील झोपड्यांसाठी वेगवेगळे नियम लागू करण्याऐवजी सर्वांसाठी समान धोरण असणे आवश्यक आहे. श्रीमंतांसाठी विकास नियंत्रण नियमांमध्ये सवलती दिल्या जातात, मग गरीबांच्या घरांवर कारवाई का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
महापालिका प्रशासन आणि महापौर यांच्यात या विषयावर समन्वयाचा अभाव असल्याचा आरोपही त्यांनी केला. सत्ताधारी पक्षाकडून १८ फूट उंचीच्या झोपड्यांना संरक्षण देण्याचा तसेच जी+१ संरचनांना संरक्षण देण्याचा प्रस्ताव मांडला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, ३९ हजार १११ झोपड्यांवरील संभाव्य कारवाईबाबत महापालिका प्रशासनाची पुढील भूमिका काय राहते आणि प्रत्यक्षात कोणत्या संरचनांवर कारवाई केली जाते, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.


No comments:
Post a Comment