
मुंबई JPN NEWS - बोरीवली रेल्वे स्थानकावर व्यावसायिक प्रमाणातील अमली पदार्थांसह पकडण्यात आलेल्या छोगाराम चौधरी याला कथितरीत्या ₹२ लाख ४० हजारांची लाच घेऊन बेकायदेशीरपणे सोडून दिल्याच्या आरोपांप्रकरणी बोरीवली जीआरपीच्या सात कर्मचाऱ्यांविरुद्ध तात्काळ एफआयआर दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि रेल्वे पोलीस महासंचालक प्रशांत एस. बर्डे यांच्याकडे अधिकृत तक्रार अर्ज दाखल करण्यात आल्याचे तक्रारदारांकडून सांगण्यात आले आहे.
या प्रकरणात केवळ दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई न करता HC/997 राकेश लीलाधर सोनवणे, HC/196 लॉरेन्स सुनील नवगिरे, HC संपत गव्हाणे, तुषार सोळंकी, धनराज पाटील, प्रदीप शिरसाट आणि समाधान सानप या सात कर्मचाऱ्यांची भूमिका तपासून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, संबंधित प्रकरणात NDPS Act 1985 मधील कलम 21, 22 आणि 59(2), भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील लागू तरतुदींनुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच फरार असल्याचे सांगितलेल्या छोगाराम चौधरीचा शोध घेऊन त्याला अटक करावी आणि अमली पदार्थ जप्त करावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.
सीसीटीव्ही फुटेज जतन करण्याची मागणी -
बोरीवली रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म तसेच आरपीएफच्या ताब्यातील संबंधित सीसीटीव्ही फुटेज तात्काळ जप्त करून सुरक्षित ठेवावे, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. या फुटेजच्या आधारे संबंधित कर्मचारी, आरोपी आणि कथित व्यवहाराबाबत अधिक स्पष्टता येऊ शकते, असा दावा तक्रारदारांनी केला आहे.
दरम्यान, केवळ दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करून उर्वरित कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न झाला का, याचीही स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. रेल्वे पोलीस आयुक्त एम. राकेश कलासागर यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची पर्यवेक्षकीय जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
मात्र, तक्रारीतील आरोपांची सत्यता तपासातून निश्चित होणे बाकी असून, संबंधित कर्मचाऱ्यांची बाजू आणि अधिकृत तपासाचा निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही. त्यामुळे या प्रकरणातील आरोपांची स्वतंत्र चौकशी महत्त्वाची ठरणार आहे.


No comments:
Post a Comment