जातीय भेदभावाचा खेळ हा देशाच्या भवितव्याशी खेळ - डॉ. नितीन राऊत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 September 2026

जातीय भेदभावाचा खेळ हा देशाच्या भवितव्याशी खेळ - डॉ. नितीन राऊत


मुंबई/नागपूर JPN NEWS - IIT बॉम्बेतील विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी उच्च शिक्षण संस्थांमधील जातीय भेदभाव आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी जातीय भेदभावाचा खेळ केला जात असेल, तर तो देशाच्या भवितव्याशी खेळ असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

देशातील सर्वोच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी हे देशाचे भवितव्य असून, बुद्धिमत्ता, मेहनत आणि गुणवत्तेच्या जोरावर पुढे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जातीय आधारावर अपमान, भेदभाव किंवा मानसिक छळाला सामोरे जावे लागू नये, असे डॉ. राऊत यांनी म्हटले आहे.

साहिल वाकोडे यांच्या कुटुंबीयांनी जातीय भेदभाव आणि छळाचे आरोप केले आहेत. या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपांसह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. 

दरम्यान, IIT बॉम्बेने जातीय भेदभावाचा आरोप नाकारला असून, साहिल यांनी संस्थेच्या SC-ST सेल किंवा प्रशासनाकडे अशा प्रकारची कोणतीही तक्रार केली नसल्याचे संस्थेने म्हटले आहे. काही विद्यार्थ्यांनीही मृत्यूमागे जातीय भेदभाव असल्याबाबत एकमत नसल्याचे सांगत, प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. 

या पार्श्वभूमीवर प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशी करण्यात यावी, अशी मागणी डॉ. राऊत यांनी केली आहे. CCTV फुटेज, विद्यार्थ्यांचे जबाब, संस्थेतील तक्रारींच्या नोंदी आणि उपलब्ध इतर पुरावे तपासण्यात यावेत, असे त्यांनी म्हटले आहे.

चौकशीत जातीय भेदभाव, मानसिक छळ किंवा आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे तथ्य आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

“मेरीटच्या नावाखाली कोणत्याही विद्यार्थ्याचा सन्मान हिरावून घेता येणार नाही आणि जातीच्या नावावर कोणत्याही विद्यार्थ्याला लक्ष्य करता येणार नाही. शिक्षणसंस्था या समान संधी आणि ज्ञानाची केंद्रे असली पाहिजेत,” अशी भूमिका डॉ. राऊत यांनी मांडली.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सुरू असून साहिल यांच्या कुटुंबीयांनी केलेले आरोप आणि संस्थेकडून मांडण्यात आलेली भूमिका तपासातून स्पष्ट होणे अपेक्षित आहे. त्यामुळे तपासातील पुरावे आणि निष्कर्ष महत्त्वाचे ठरणार आहेत. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS