
मुंबई JPN NEWS - मुंबई कोस्टल रोडवर कारचा अपघात झाल्यानंतर पथदिवे आणि सीसीटीव्ही यंत्रणेसाठी आवश्यक असलेल्या केबल चोरीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कोस्टल रोडवरील काही भागांत केबल चोरी आणि केबल कापण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने पथदिवे तसेच सीसीटीव्ही यंत्रणेवर त्याचा परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका प्रशासनाने आता केबल चोरी रोखण्यासाठी उपाययोजनांना वेग दिला आहे.
धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता मार्च २०२४ पासून टप्प्याटप्प्याने वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी या मार्गावर पथदिवे तसेच निगराणीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर विविध ठिकाणी पथदिव्यांच्या केबल चोरीच्या घटना समोर आल्या.
सुरुवातीला पथदिव्यांसाठी तांब्याच्या केबलचा वापर करण्यात आला होता. चोरीच्या घटना वाढल्यानंतर तांब्याच्या केबलऐवजी अॅल्युमिनियम केबल बसविण्यात आल्या. मात्र, महालक्ष्मी मंदिर, मद्रासी वाडी, मार्कडेश्वर मंदिर आणि वरळी परिसरात अॅल्युमिनियम केबल्सही चोरीला जाण्याचे तसेच कापण्याचे प्रकार सुरूच राहिले.
केबल चोरीमुळे काही भागांतील पथदिवे बंद पडत असून, त्यामुळे रात्रीच्या वेळी कोस्टल रोडवरील प्रकाशव्यवस्थेवर परिणाम होत आहे. काही ठिकाणी चोरी झालेल्या केबल्सची दोन ते तीन वेळा पुनर्बांधणी किंवा बदली करावी लागल्याचे पालिकेने सांगितले.
या घटनांप्रकरणी एल अँड टी, एचसीसी तसेच संचालन व देखभाल कंत्राटदारांमार्फत संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये आतापर्यंत सुमारे २० ते २५ एफआयआर किंवा तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. केबल चोरी रोखण्यासाठी मुंबई पोलीस आणि महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकही नुकतीच झाली.
दरम्यान, आतापर्यंत सुमारे ११० किलोमीटर लांबीच्या पॉवर केबल्स बदलण्यात आल्या आहेत. तसेच सीसीटीव्ही यंत्रणेसाठी वापरण्यात येणाऱ्या फायबर कम्युनिकेशन केबल्स चोरीला जाणे किंवा कापल्या जाण्याच्या घटनांमुळे सुमारे ६० ते ६५ सीसीटीव्ही कॅमेरे बंद झाले आहेत. हे कॅमेरे आणि संबंधित यंत्रणा पूर्ववत करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
कोस्टल रोडवरील अपघातांच्या पार्श्वभूमीवर पथदिवे आणि सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित झाले असून, केबल चोरी रोखण्यासाठी तसेच सुरक्षा व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी पालिका प्रशासनाने आता अधिक ठोस उपाययोजना सुरू केल्या आहेत.


No comments:
Post a Comment