
मुंबई JPN NEWS - विनातिकीट तसेच अयोग्य किंवा अवैध तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेने तिकीट तपासणीची मोहीम तीव्र केली आहे. एप्रिल ते ऑगस्ट २०२६ या पाच महिन्यांच्या कालावधीत मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकांनी तब्बल १८.०३ लाख प्रवाशांवर कारवाई करून १४०.८१ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.
गेल्या वर्षी याच कालावधीत १७.१९ लाख प्रकरणांतून १००.५० कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. त्यामुळे यंदा कारवाईच्या प्रकरणांमध्ये जवळपास पाच टक्क्यांनी, तर दंडाच्या रकमेत ४० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
विभागनिहाय आकडेवारीनुसार, मुंबई विभागात सर्वाधिक ८.८० लाख प्रकरणांतून ५८.४६ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. भुसावळ विभागात ३.४२ लाख प्रकरणांतून ३५.५२ कोटी, पुणे विभागात १.८६ लाख प्रकरणांतून १६.२९ कोटी, नागपूर विभागात २.११ लाख प्रकरणांतून १५.८३ कोटी आणि सोलापूर विभागात ९५ हजार प्रकरणांतून ६.१३ कोटी रुपये वसूल झाले. मध्य रेल्वेच्या मुख्यालयाकडूनही ८८ हजार प्रकरणांतून ८.५७ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
केवळ ऑगस्ट २०२६ मध्ये २.५७ लाख विनातिकीट किंवा अवैध तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. ऑगस्ट २०२५ मध्ये ही संख्या २.७६ लाख होती. मात्र, ऑगस्ट २०२६ मध्ये दंडवसुली १९.५० कोटी रुपयांवर पोहोचली, तर ऑगस्ट २०२५ मध्ये १३.७८ कोटी रुपये वसूल झाले होते. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात दंडवसुलीत ४१ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
विनातिकीट प्रवासासाठीचा किमान दंड २५० रुपयांवरून ५०० रुपये करण्यात आल्यानंतर मध्य रेल्वेने तिकीट तपासणी अधिक कडक केली आहे. स्थानकांवरील नियमित तपासणीसोबतच अचानक धाडी, प्रवेश आणि निर्गमन मार्गांवरील ‘फोर्ट्रेस’ तपासणी, सखोल तपासणी आणि ‘मेगा’ तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. मेल, एक्स्प्रेस, पॅसेंजर आणि विशेष गाड्यांसह मुंबई व पुणे विभागातील उपनगरीय लोकलमध्येही या मोहिमा सुरू आहेत.
मध्य रेल्वेने प्रवाशांना वैध तिकीट घेऊनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. विनातिकीट प्रवास हा रेल्वे कायद्यानुसार दंडनीय असून, अशा प्रवासाबाबत रेल्वेने ‘झिरो टॉलरन्स’चे धोरण स्वीकारले आहे. प्रवाशांनी गैरसोय आणि दंड टाळण्यासाठी जबाबदारीने व वैध तिकिटासह प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.


No comments:
Post a Comment