
मुंबई JPN NEWS - मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये आता विद्यार्थ्यांना संविधानातील मूल्ये, अधिकार आणि कर्तव्यांची माहिती देण्यासाठी विशेष शैक्षणिक कार्यक्रम राबविला जाणार आहे. इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या वयोगटानुसार शैक्षणिक साहित्य तयार करून त्यातून संविधानिक मूल्ये, नागरी जबाबदारी, मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये समजावून सांगण्यात येणार आहेत. (BMC School Education)
या उपक्रमासाठी महापालिका शिक्षण विभागाने निविदा प्रक्रिया राबविली असून दिशातरंग व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी महापालिकेकडून सुमारे ८ कोटी ९० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकातील ज्ञान न देता त्यांच्यामध्ये जबाबदार नागरिकत्वाची जाणीव निर्माण करण्याचा या उपक्रमामागील उद्देश आहे. समानता, बंधुता, सहिष्णुता, शिस्त, सामाजिक जबाबदारी आणि लोकशाही मूल्ये विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनात रुजविण्यासाठी कृतीआधारित आणि अनुभवाधारित पद्धतीने शिक्षण दिले जाणार आहे.
सहावीच्या विद्यार्थ्यांना डॉ. आंबेडकरांच्या विचारांचे धडे -
या उपक्रमांतर्गत इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित पुस्तक उपलब्ध करून दिले जाणार आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सामाजिक समता, शिक्षण, अधिकार आणि सामाजिक न्याय याबाबत माहिती देण्यात येणार आहे. पुस्तकांची छपाई करून ती विद्यार्थ्यांना देण्यात येणार असून त्यातील धडे शाळांमध्ये शिकविले जाणार आहेत.
शिक्षण विभागाच्या म्हणण्यानुसार, बालवयातच विद्यार्थ्यांना संविधान आणि लोकशाही मूल्यांची ओळख करून दिल्यास त्यांच्या विचारसरणीवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. संविधानिक मूल्यांसोबतच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, कर्तव्यभावना आणि जबाबदार नागरिकत्व विकसित करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि राज्य अभ्यासक्रम आराखड्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्दिष्टांनुसार हा कार्यक्रम तयार केला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या वयानुसार आणि समजुतीनुसार विविध शैक्षणिक साहित्य व उपक्रमांच्या माध्यमातून संविधानिक मूल्यांचे शिक्षण देण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.


No comments:
Post a Comment