मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; ३७६ गोविंदा जखमी, ७ वर्षीय मुलाचा मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 September 2026

मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; ३७६ गोविंदा जखमी, ७ वर्षीय मुलाचा मृत्यू


मुंबई JPN NEWS - मुंबईत दहीहंडी उत्सवादरम्यान विविध ठिकाणी झालेल्या घटनांमध्ये ३७६ गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी ५३ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ३७ जणांवर उपचार सुरू आहेत. २८६ जखमींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, मालाडच्या मालवणी परिसरात दहीहंडी खेळताना विटांचा कॉलम कोसळल्याने ७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.

महापालिकेच्या माहितीनुसार, ६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत मुंबईतील विविध सरकारी आणि महापालिका रुग्णालयांमध्ये दहीहंडी उत्सवादरम्यान जखमी झालेल्या ३७६ गोविंदांची नोंद झाली आहे. यामध्ये शहर विभागातील रुग्णालयांत १८३, पूर्व उपनगरातील रुग्णालयांत ६२ आणि पश्चिम उपनगरातील रुग्णालयांत १२६ जखमींची नोंद झाली.

जखमींच्या संख्येत केईएम रुग्णालयात सर्वाधिक ७६, त्यानंतर एचबीटी ट्रॉमा रुग्णालयात ३४, राजावाडी रुग्णालयात ३३, व्ही. देसाई रुग्णालयात ३३ आणि नायर रुग्णालयात ३२ जखमींची नोंद झाली आहे. सायन रुग्णालयात १८ आणि बीडीबीए रुग्णालयात १८ जखमींवर उपचार करण्यात आले.

मालवणीत ७ वर्षीय मुलाचा मृत्यू - 
दहीहंडी उत्सवादरम्यान मालाड पश्चिमेतील मालवणी, मार्वे रोडवरील चिकूवाडी येथील एकता वेल्फेअर सोसायटीत दुर्घटना घडली. ५ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे ३ वाजता काही मुले स्थानिक पातळीवर दहीहंडी खेळत होती.

हंडीची दोरी झाडाला आणि तळमजल्यावरील विटांच्या कॉलमला बांधण्यात आली होती. हंडी फोडण्याच्या प्रयत्नादरम्यान हा विटांचा कॉलम अचानक कोसळला. त्याखाली ७ वर्षीय रुद्र कदम हा मुलगा सापडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

रुद्रला तातडीने मालवणी जनरल रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच महापालिका कर्मचारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

दहीहंडी उत्सवादरम्यान जखमी झालेल्या गोविंदांना महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार देण्यात आले. गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून इतरांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

महापौरांनी केईएममध्ये जाऊन जखमी गोविंदांची विचारपूस - 
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दहीहंडी उत्सवादरम्यान जखमी झालेल्या गोविंदांची केईएम रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यांनी उपचार घेत असलेल्या गोविंदांची आणि त्यांच्या नातेवाईकांची आस्थेने विचारपूस करून त्यांना धीर दिला. जखमी गोविंदांना आवश्यक ते सर्व उपचार प्राधान्याने आणि दर्जेदार पद्धतीने देण्याच्या सूचना त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या. महापौरांनी दिवसभरात मुंबईतील विविध दहीहंडी उत्सवांनाही भेटी देऊन गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला. गोविंदा पथकांनी शिस्त, संघभावना आणि सुरक्षिततेला प्राधान्य देऊन दहीहंडी उत्सव साजरा करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS