मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट, ७ वर्षीय मुलाचा मृत्यू,३२ गोविंदा जखमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 September 2026

मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट, ७ वर्षीय मुलाचा मृत्यू,३२ गोविंदा जखमी


मुंबई JPN NEWS - मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट लागले असून विविध ठिकाणी झालेल्या घटनांमध्ये ३२ गोविंदा जखमी झाले आहेत. त्यापैकी २८ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून ४ जणांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, मालाडच्या मालवणी परिसरात दहीहंडी खेळताना भिंतीचा कॉलम कोसळल्याने ७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.

महापालिकेला मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी ३ वाजेपर्यंत शहरातील विविध सरकारी आणि महापालिका रुग्णालयांमध्ये दहीहंडी उत्सवादरम्यान जखमी झालेल्या ३२ गोविंदांची नोंद झाली. त्यापैकी ४ जण रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर २८ जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला.

दरम्यान, दुपारी ३.०१ वाजण्याच्या सुमारास मालाड पश्चिमेतील मालवणी, मार्वे रोडवरील चिकूवाडी येथील एकता वेल्फेअर सोसायटीत स्थानिक पातळीवर दहीहंडीचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी काही मुले स्वतःहून दहीहंडी खेळत होती. हंडीची दोरी झाडाला आणि तळमजल्यावरील विटांच्या कॉलमला बांधण्यात आली होती.

हंडी फोडण्याच्या प्रयत्नादरम्यान विटांचा कॉलम अचानक कोसळला आणि त्याखाली ७ वर्षीय रुद्र कदम हा मुलगा सापडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने मालवणी जनरल रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच महापालिका कर्मचारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, दहीहंडी उत्सवादरम्यान अन्य कोणतीही मोठी अनुचित घटना घडल्याची नोंद नसल्याचे महापालिकेने सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS