
मुंबई JPN NEWS - महापालिकेच्या एम/पश्चिम वॉर्डातील भंगाराच्या लिलावातील माल गोडाऊनमधून बाहेर काढून देण्यासाठी शासकीय शुल्काव्यतिरिक्त १ लाख ७० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप असलेल्या दोन महापालिका कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून ताब्यात घेतले. यातील एका आरोपीला ८० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले, तर दुसऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याला त्याच्या कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले.
एसीबीकडे मिळालेल्या तक्रारीनुसार, तक्रारदाराने एम/पश्चिम वॉर्ड, चेंबूर येथे झालेल्या हातगाडी आणि भंगाराच्या लिलावातील माल गोडाऊनमधून बाहेर काढून देण्याची प्रक्रिया केली होती. हा माल बाहेर काढण्यासाठी कार्यकारी सहाय्यक विजय सिताराम ठाकरे (३०) आणि वरिष्ठ निरीक्षक रमेश गोपाळ साळवे (५७) यांनी शासकीय शुल्काव्यतिरिक्त १ लाख ७० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने २ सप्टेंबर रोजी मुंबई एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर ३ सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या पडताळणीदरम्यान विजय ठाकरे यांनी स्वतःसह रमेश साळवे यांच्यासाठी लाचेचा पहिला हप्ता म्हणून ८० हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
८० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ -
एसीबीने ४ सप्टेंबर रोजी सापळा रचला. यावेळी विजय ठाकरे यांनी तक्रारदाराकडून ८० हजार रुपये स्वीकारले. त्यानंतर या रकमेबाबत रमेश साळवे यांना माहिती देण्यात आली. त्यांनी त्यास होकार देऊन अनुमोदन दिल्याचे एसीबीने नमूद केले आहे.
ठाकरे यांना एम/पश्चिम वॉर्डच्या माहुलगाव येथील भंगाराच्या गोडाऊनमध्ये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर रमेश साळवे यांनाही त्यांच्या कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले. दोन्ही आरोपींच्या अंगझडतीत प्रत्येकी एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विजय ठाकरे यांना दुपारी १.३६ वाजता, तर रमेश साळवे यांना २.२२ वाजता ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक सागर अरगडे यांनी केले. पर्यवेक्षण अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस आयुक्त शुभदा मोरे यांनी काम पाहिले. कारवाईला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ अधिकारी संदीप दिवाण, अनिल घेरडीकर आणि अनंत साळुंखे यांचे मार्गदर्शन मिळाले.


No comments:
Post a Comment