
मुंबई JPN NEWS - दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या सीबीआय चौकशीला सुरुवात झाल्यानंतर या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना पुन्हा वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या कुटुंबीयांची नावे या प्रकरणाशी जोडण्यावर आक्षेप घेतला असून, यापुढे कायदेशीर कारवाईचा मार्ग स्वीकारण्याचा इशारा दिला.
बॉम्बे हायकोर्टाच्या निर्देशानंतर सीबीआयने दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणात एफआयआर दाखल करून तपास सुरू केला आहे. सीबीआयच्या एफआयआरमध्ये कोणालाही आरोपी म्हणून नमूद करण्यात आलेले नसून, तक्रारीच्या आधारे विविध व्यक्तींच्या भूमिकेची चौकशी करण्याचा उल्लेख असल्याचे वृत्त आहे.
या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी, ज्या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे, त्यात आपले नाव जोडले जात असल्याचा दावा केला. अशा प्रकारे चारित्र्यहनन केले जात असल्याचा आरोप करत त्यांनी, “आता बास झालं, नाहीतर आम्हालाही कायदेशीर पावलं उचलावी लागतील,” असा इशारा दिला.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनीही सोशल मीडिया पोस्टद्वारे दिशा सालियन यांच्याशी आपली कधीही भेट किंवा ओळख झाली नसल्याचे म्हटले आहे. गेल्या काही वर्षांपासून पुराव्याशिवाय आपले नाव या प्रकरणाशी जोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच सीबीआयने राजकीय हस्तक्षेपाशिवाय आणि निष्पक्षपणे चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दिशा सालियन यांच्या मृत्यूच्या प्रकरणात सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरनंतर तपासाला नव्याने सुरुवात झाली आहे. तक्रारीतील आरोप आणि संबंधित व्यक्तींच्या भूमिकांची चौकशी तपास यंत्रणेकडून केली जाणार असून, या तपासातून पुढील बाबी स्पष्ट होणार आहेत.


No comments:
Post a Comment