Alfara’a Infraprojects प्रकरणात ईडीची मुंबई-दिल्लीत छापेमारी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 September 2026

Alfara’a Infraprojects प्रकरणात ईडीची मुंबई-दिल्लीत छापेमारी


मुंबई JPN NEWS - बँक ऑफ बडोदाची कोट्यवधी रुपयांची थकबाकी आणि कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुंबई आणि दिल्ली येथे मोठी कारवाई केली. Alfara’a Infraprojects Pvt. Ltd. (AIPL) तसेच कंपनीचे संचालक, निकटवर्तीय आणि संबंधित संस्थांशी निगडित ११ ठिकाणांवर १० सप्टेंबर रोजी झाडाझडती घेण्यात आली. या कारवाईत भारतीय चलनासह परकीय चलन, एफडी, महत्त्वाची कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.

बँक ऑफ बडोदाच्या तक्रारीवरून केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) चेन्नई येथील आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) तपास सुरू केला आहे.

ईडीच्या तपासानुसार, नागरी बांधकाम क्षेत्रातील AIPL कंपनीने २०१२ मध्ये बँक ऑफ बडोदाकडून १०३ कोटी रुपयांची कर्ज सुविधा घेतली होती. त्यानंतर २०१५ मध्ये ही कर्जमर्यादा वाढवून ३६०.५० कोटी रुपये करण्यात आली. मात्र, कंपनीचे खाते १८ जून २०१८ रोजी अनुत्पादक मालमत्ता (NPA) म्हणून घोषित करण्यात आले. त्यावेळी कंपनीकडे २५५.७४ कोटी रुपयांची थकबाकी होती.

ईडीच्या प्राथमिक तपासात सुमारे ७५.०२ कोटी रुपयांच्या लेटर्स ऑफ क्रेडिट (LC) devolve झाल्याचे, तर सुमारे १६४.५९ कोटी रुपयांच्या बँक गॅरंटी (BG) invoke झाल्याचे आढळून आले आहे. या व्यवहारांतून गुन्ह्यातून मिळालेली रक्कम निर्माण झाल्याचा ईडीचा संशय आहे. ही रक्कम विविध लाभार्थी आणि मध्यस्थ संस्थांमार्फत अनेक स्तरांमध्ये फिरवून AIPL आणि तिच्या समूहातील संस्थांकडे वळवण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

दरम्यान, ग्लेझ्ड टाइल्सच्या निर्यातीच्या नावाखाली परदेशी बँक गॅरंटी उघडण्यात आल्या; मात्र प्रत्यक्षात निर्यात झाली नसल्याचे ईडीने म्हटले आहे. या व्यवहारांद्वारे सिंगापूर आणि हाँगकाँगमधील संस्थांकडे निधी पाठवण्यात आल्याचा तपास यंत्रणेचा दावा आहे. AIPLकडून देयकांची पूर्तता न झाल्याने काही एलसी आणि बीजी बँकेकडून वटवण्यात आल्या, परिणामी बँकेचे आर्थिक नुकसान झाल्याचे ईडीने नमूद केले आहे.

झाडाझडतीदरम्यान १८ लाख रुपयांची भारतीय रोकड, ९,५६७ अमेरिकी डॉलर आणि ८६० क्वाचा जप्त करण्यात आले. याशिवाय सुमारे १.०२ कोटी रुपयांच्या एफडी, १.७५ कोटी जपानी येन आणि १,०३,१४५ अमेरिकी डॉलर इतक्या ठेवी गोठवण्यात आल्या आहेत.

ईडीने बँक व्यवहार, एलसी, बँक गॅरंटी आणि स्थावर मालमत्तांशी संबंधित कागदपत्रांसह विविध डिजिटल उपकरणे व नोंदीही ताब्यात घेतल्या आहेत. या कागदपत्रांमधून कथित गैरव्यवहारातून निर्माण झालेल्या रकमेचा प्रवाह आणि विविध संस्थांमार्फत करण्यात आलेल्या व्यवहारांची अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे ईडीने स्पष्ट केले आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS