
मुंबई JPN NEWS - मुंबईच्या कोस्टल रोडवर रविवारी पहाटे भरधाव BMW कारचा भीषण अपघात झाला. मरीन ड्राइव्हहून हाजी अलीच्या दिशेने जात असताना लाल कॉलेजसमोरील लोटस जेट्टीजवळ ही दुर्घटना घडली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी आहे.
कोस्टल रोड कंट्रोल रूमला २० सप्टेंबर रोजी पहाटे ५.२० वाजता या अपघाताची माहिती मिळाली. प्राथमिक माहितीनुसार, अतिवेगामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने BMW कारला अपघात झाल्याचे सांगण्यात आले आहे.
अपघातानंतर कारमधील चार जखमींना तातडीने उपचारासाठी नायर रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, त्यापैकी तिघांना डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.
नायर रुग्णालयाच्या CMO कडून मिळालेल्या माहितीनुसार, शनय गज्जल (२१), धिर्या सेठ (१७) आणि एका २५ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर एका २० वर्षीय तरुणाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर ट्रॉमा वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त BMW कारची पाहणी करण्यात आली असून, दुर्घटनेमागील नेमके कारण आणि वाहनाचा वेग याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.
या भीषण अपघातामुळे पहाटेच्या वेळी कोस्टल रोडवर काही काळ खळबळ उडाली. मृतांची ओळख आणि अपघाताची संपूर्ण परिस्थिती तपासातून स्पष्ट होणार आहे.


No comments:
Post a Comment