कोस्टल रोडवर बेस्ट बसची संख्या वाढवा, आमदार रईस शेख यांची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 September 2026

कोस्टल रोडवर बेस्ट बसची संख्या वाढवा, आमदार रईस शेख यांची मागणी


मुंबई JPN NEWS - मुंबईकरांच्या सोयीसाठी आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उभारण्यात आलेल्या धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज किनारा मार्गावर (कोस्टल रोड) बेस्ट बसची संख्या वाढवावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केली आहे. सध्या कोस्टल रोडवर केवळ दोनच बेस्ट बस धावत असून, त्याचा थेट फटका सामान्य प्रवाशांना बसत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

या मागणीसंदर्भात आमदार रईस शेख यांनी मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे आणि बेस्टच्या महाव्यवस्थापक डॉ. सोनिया सेठी यांना पत्र पाठवले आहे.

सध्या केवळ दोन बस - 
पश्चिम किनारपट्टीवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी कोस्टल रोडची उभारणी करण्यात आली. मात्र, या मार्गावर सध्या A84 (डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक ते ओशिवरा डेपो) आणि A78 (एनसीपीए ते भायखळा) या दोनच बेस्ट बस सेवा सुरू आहेत.

या दोन्ही बसना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे शेख यांनी म्हटले आहे. त्यामुळे वाढती प्रवासी मागणी लक्षात घेऊन या मार्गावर आणखी बेस्ट बस सुरू करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

टॅक्सीचा खर्च सामान्य मुंबईकरांच्या खिशाला -
कोस्टल रोडवर पादचारी, अवजड वाहने, तीनचाकी आणि दुचाकींना प्रवेश नसल्याने सार्वजनिक वाहतुकीसाठी बेस्ट बसचा पर्याय महत्त्वाचा ठरतो. मात्र, बसची संख्या अपुरी असल्याने अनेक प्रवाशांना टॅक्सीचा पर्याय स्वीकारावा लागतो. त्यामुळे कमी वेळेत प्रवास करण्यासाठी उभारलेल्या कोस्टल रोडचा वापर करताना सामान्य मुंबईकरांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत असल्याचा आरोप शेख यांनी केला आहे.

“बेस्ट बसचे भाडे तुलनेने सर्वसामान्यांच्या आवाक्यात असून, या मार्गावर प्रवासासाठी सुमारे १२ ते ५० रुपयांपर्यंत भाडे आकारले जाते. मात्र बसची संख्या कमी असल्याने प्रवाशांना महागड्या टॅक्सीचा पर्याय घ्यावा लागतो,” असे शेख यांनी म्हटले आहे.

१२ हजार ७२१ कोटींच्या प्रकल्पावर प्रश्न - 
कोस्टल रोड प्रकल्पावर महापालिकेकडून सुमारे १२ हजार ७२१ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. या प्रकल्पाचा लाभ अधिकाधिक सामान्य मुंबईकरांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे या मार्गावर पुरेशा संख्येने बेस्ट बस चालविण्याची मागणी शेख यांनी केली आहे.

बेस्टकडे कंत्राटी तत्त्वावरील २,५३३ बस उपलब्ध असल्याचा उल्लेख करत, त्यापैकी आवश्यक बस कोस्टल रोडवर वाढवता येतील, असेही त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

‘दोन बस चालवणे म्हणजे मुंबईकरांशी दुजाभाव’ -
“सामान्य मुंबईकरांच्या करातून उभारण्यात आलेल्या कोस्टल रोडवर अवघ्या दोन बस चालवणे योग्य नाही. या मार्गाचा लाभ सर्वसामान्य प्रवाशांना मिळण्यासाठी बेस्ट बसची संख्या तातडीने वाढवावी,” अशी मागणी आमदार रईस शेख यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS