कूपर, ट्रॉमा रुग्णालयातील रिक्त पदांचा दुष्काळ संपणार; ७९० पदांची भरती - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 September 2026

कूपर, ट्रॉमा रुग्णालयातील रिक्त पदांचा दुष्काळ संपणार; ७९० पदांची भरती


मुंबई JPN NEWS - कूपर रुग्णालय आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयातील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी तब्बल ७९० अतिरिक्त पदांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई उत्तर-पश्चिमचे खासदार रवींद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखाली जोगेश्वरी येथील ट्रॉमा रुग्णालयात झालेल्या बैठकीत रुग्णालयातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

महापालिकेच्या आरोग्य विभागाने २०१३ पासून या रुग्णालयांसाठी आवश्यक मनुष्यबळाचा स्टाफिंग पॅटर्न तयार केला नव्हता. आता हा पॅटर्न तयार करण्यात आला असून त्यानुसार डॉक्टरांसह विविध संवर्गातील ७९० पदे भरण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णसेवा अधिक सक्षम होण्याची अपेक्षा आहे.

ट्रॉमा रुग्णालयात फिजिओथेरपी विभाग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कूपर रुग्णालयाप्रमाणेच ट्रॉमा रुग्णालयात बालशस्त्रक्रिया सेवा सुरू करण्याची तयारी आहे. नवजात बालकांसाठीच्या एनआयसीयू विभागाच्या निविदेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

ट्रॉमा रुग्णालयातील सध्या १० खाटांचा आयसीयू असून त्याची क्षमता १०० खाटांपर्यंत वाढविण्याची मागणी वायकर यांनी केली. याबाबत रुग्णालय प्रशासन निर्णय घेणार आहे. दरम्यान, ओशिवरा येथील १५० खाटांच्या प्रसूती रुग्णालयाचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. स्कॉट्स कॉलनी येथील प्रसूती रुग्णालयाचा आराखडा तयार असून लवकरच निविदा काढण्यात येणार आहे.

रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची वयोमर्यादा ३८ वरून ४३ वर्षे करण्याचाही प्रस्ताव विचाराधीन आहे. कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा न करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले. रुग्णसेवा सुधारण्यासाठी ११ सदस्यीय देखरेख समिती स्थापन करण्याची सूचना करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS