भाजप-शिवसेनेत अंतर्गत संघर्ष उफाळला; सत्तेवर लाथ मारण्याचा शिंदे गटाचा इशारा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 September 2026

भाजप-शिवसेनेत अंतर्गत संघर्ष उफाळला; सत्तेवर लाथ मारण्याचा शिंदे गटाचा इशारा


मुंबई JPN NEWS - मुंबई महापालिकेतील सत्ताधारी भाजप-शिवसेना महायुतीमध्ये अभय योजनेच्या मुद्द्यावरून आता अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. झोपडीधारकांकडून पैसे उकळले जात असल्याचा गंभीर आरोप करत शिवसेना (शिंदे गट) मनपा गटनेते अमेय घोले यांनी स्थायी समितीच्या बैठकीतून सभात्याग केला. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास स्थायी समितीपासून दूर राहण्याचा, तसेच वेळ पडल्यास महापालिकेतील सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा त्यांनी दिला.

घोले यांनी पत्रकारांशी बोलताना अभय योजनेच्या अंमलबजावणीवरून प्रशासनावर जोरदार टीका केली. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ही योजना लागू करण्यात आली. झोपडीधारकांना कमी खर्चात पात्र करून त्यांना हक्काचे घर मिळवून देणे हा या योजनेचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र, सध्या या योजनेच्या नावाखाली काही अधिकारी आणि संबंधित यंत्रणांकडून गरीब झोपडीधारकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप घोले यांनी केला. रेंट कंट्रोलर आणि आरसी अर्थात कॉलनी अधिकाऱ्यांकडून कथितरीत्या पाच ते दहा लाख रुपयांची मागणी केली जात असल्याचा दावा त्यांनी केला.

‘गरिबांच्या हक्काच्या घराच्या फाईलची बोली लागणार असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही,’ असा आक्रमक पवित्रा घोले यांनी घेतला. या विषयावर गेल्या दीड महिन्यापासून स्थायी समितीत पाठपुरावा करूनही निर्णय होत नसल्याने अखेर निषेध म्हणून सभात्याग केल्याचे त्यांनी सांगितले.

“आम्ही आधी शिवसैनिक आहोत. सत्तेपेक्षा गरिबांना न्याय मिळणे महत्त्वाचे आहे. गरिबांवर अन्याय होत असेल तर सत्तेवर लाथ मारू; मात्र अन्याय सहन करणार नाही,” असा स्पष्ट इशारा घोले यांनी दिला.

जोपर्यंत संबंधित तीन अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत स्थायी समितीचा भाग होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सत्ताधारी आघाडीतील घटक पक्षाच्या गटनेत्यानेच घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे महापालिकेतील भाजप-शिवसेना संबंधांमध्ये नव्या राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS