दादर पूर्व स्थानक परिसर कोंडीमुक्त करण्यासाठी उपाययोजना - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 September 2026

दादर पूर्व स्थानक परिसर कोंडीमुक्त करण्यासाठी उपाययोजना


मुंबई JPN NEWS - दादर पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी आणि अनियंत्रित वाहनव्यवस्थेमुळे प्रवाशांना होणारा त्रास कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. मुंबई महापालिका, वाहतूक पोलीस, मध्य रेल्वे, बेस्ट प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून परिसराचे नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दादर पूर्व स्थानक परिसराची संबंधित यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतीच पाहणी केली. यावेळी एफ उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त, माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभागाचे अधिकारी, बेस्टच्या वाहतूक व नियोजन विभागाचे अधिकारी, दादर रेल्वे स्थानक व्यवस्थापक तसेच शिवसेना शिंदे गटाचे गटनेते अमय घोले उपस्थित होते.

स्थानकाबाहेर टॅक्सी, खासगी वाहने आणि बेस्ट बसेसची मोठी वर्दळ असल्याने अनेकदा वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यात अनधिकृत पार्किंग आणि काही ठिकाणी झालेल्या अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांनाही ये-जा करताना अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध करण्यावर भर देण्यात येणार आहे.

स्वामीनारायण मंदिरासमोरील परिसरात टॅक्सीसाठी स्वतंत्र मार्गिका आणि अधिकृत टॅक्सी स्टँड उभारण्याचे नियोजन आहे. सध्या स्थानकाबाहेर सुमारे आठ टॅक्सी उभ्या राहतील अशा स्वरूपाची अनधिकृत व्यवस्था असल्याचे निदर्शनास आले असून ती हटविण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. बेस्ट बसेससाठीही स्वतंत्र मार्गिका करण्याचा विचार सुरू आहे.

स्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना ऊन आणि पावसापासून संरक्षण मिळावे यासाठी शेड तसेच आसनव्यवस्था करण्याचेही नियोजन आहे. परिसरातील काही गाळेधारकांनी केलेले अनधिकृत विस्तार हटवून प्रवाशांसाठी जागा मोकळी करण्याची कार्यवाहीही प्रस्तावित आहे.

दादर पूर्व स्थानक परिसर अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि प्रवाशांना सोयीचा करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधून उपाययोजना केल्या जाणार आहेत. टॅक्सी स्टँड, टॅक्सी आणि बेस्टसाठी स्वतंत्र मार्गिका तसेच प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचे गटनेते अमय घोले यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS