कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस अंमलदाराशी गैरवर्तन; आरोपीला सहा महिन्यांची शिक्षा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 September 2026

कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस अंमलदाराशी गैरवर्तन; आरोपीला सहा महिन्यांची शिक्षा


मुंबई JPN NEWS - कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस अंमलदाराशी अश्लील हातवारे आणि शिवीगाळ करून गैरवर्तन केल्याप्रकरणी आरोपीला न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. मुंबईतील अतिरिक्त सत्र न्यायालय, कोर्ट क्रमांक ३४ यांनी २१ सप्टेंबर २०२६ रोजी आरोपी सरोज दुर्योधन सी. याला दोषी ठरवत भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार शिक्षा सुनावली.

२१ ऑगस्ट २०१८ रोजी महिला पोलीस अंमलदार वाहतूक सुरळीत करण्याचे कर्तव्य बजावत असताना आरोपीने त्यांच्याकडे अश्लील हातवारे केले. तसेच अश्लील शिवीगाळ करून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याचा आरोप होता. याप्रकरणी महिला पोलीस अंमलदार यांच्या तक्रारीवरून गोवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१६/२०१८ दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणात आरोपीविरुद्ध कलम ३५३, ३५४(अ) आणि ५०९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने आरोपीला कलम ३५३ अन्वये सहा महिन्यांचा कारावास आणि ५०० रुपये दंड, कलम ३५४(अ) अन्वये सहा महिन्यांचा कारावास आणि ५०० रुपये दंड, तसेच कलम ५०९ अन्वये सहा महिन्यांचा कारावास आणि ५०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास प्रत्येक कलमासाठी अतिरिक्त एक महिन्याच्या कैदेची तरतूद करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रियंका पाटील यांनी केला. तपासादरम्यान सबळ पुरावे संकलित करून त्यांचे योग्य दस्तऐवजीकरण करण्यात आले. सरकारी अभियोक्ता ज्योती सावंत आणि पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अजय यादव यांनी न्यायालयात सरकारी पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडली. तपास आणि न्यायालयीन कामकाजातील प्रभावी समन्वयामुळे आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध झाला आणि न्यायालयाने त्याला दोषी ठरवत शिक्षा सुनावली.

ही कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त (का. व सु.) मनोजकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) धनंजय कुलकर्णी, पोलीस उपायुक्त (पूर्व परिमंडळ-१) समीर शेख, सहायक पोलीस आयुक्त चेंबूर विभाग रामराव ढिकले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत पोलीस निरीक्षक दयानंद जाधव, मसपोनि प्रियंका पाटील, पोउपनि अजय यादव, सपोउपनि भंडवलकर, पोहवा ज्ञानेश्वर राठोड, पोहवा बोराटे आणि मपोहवा खरात यांनी सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS