मुंबईतील लोकल फेऱ्या २०३० पर्यंत ३५०० करण्याचे लक्ष्य, सावंतवाडी एक्स्प्रेसमुळे कोकणाला मोठी चालना - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 September 2026

मुंबईतील लोकल फेऱ्या २०३० पर्यंत ३५०० करण्याचे लक्ष्य, सावंतवाडी एक्स्प्रेसमुळे कोकणाला मोठी चालना


मुंबई JPN NEWS - मुंबईतील लोकल रेल्वे सेवा अधिक सक्षम करण्यासाठी सध्या सुरू असलेल्या विविध प्रकल्पांच्या माध्यमातून दररोजच्या लोकल फेऱ्यांची संख्या २०३० पर्यंत ३,२०० वरून ३,५०० करण्याचे लक्ष्य असल्याचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. यासाठी सुमारे १८ हजार कोटी रुपयांची कामे सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मुंबई-सावंतवाडी एक्स्प्रेसचा शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

मुंबई रेल्वे नेटवर्कच्या विस्तारासाठी जोगेश्वरी, दादर, वसई रोड आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे नवीन फलाट, पिट लाइन आणि स्टेबलिंग लाइन उभारण्यात येत असल्याचे वैष्णव यांनी सांगितले. लोकल प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी २३८ वातानुकूलित लोकल रेक तयार करण्याचे आदेश देण्यात आले असून, पहिली नवीन एसी लोकल २०२७ मध्ये उपलब्ध होणार आहे.

सावंतवाडी एक्स्प्रेसमुळे कोकणाला मोठी चालना - 
सावंतवाडी एक्स्प्रेस ही मुंबई आणि कोकणातील लाखो कुटुंबांना जोडणारी सेवा ठरेल. या दैनंदिन रेल्वेमुळे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील प्रवाशांना मोठा फायदा होणार असून, कोकणातील पर्यटन, व्यापार आणि रोजगाराला चालना मिळेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केला.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेली ही सेवा कोकणवासीयांसाठी मोठी भेट असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या रेल्वेमुळे मुंबई-कोकण संपर्क अधिक मजबूत होऊन कोकणच्या पर्यटनाला नवी गती मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.

CSMT–सावंतवाडी रोड दैनंदिन एक्स्प्रेसला दादर, ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळसह विविध स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS