मुंबई JPN NEWS - वरळी येथील डांबर निर्मिती प्लांटच्या जागेवरून मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार रणकंदन झाले. काँग्रेसचे गटनेते अशरफ आजमी यांनी संबंधित जागा विकण्यात आल्याचा आरोप केल्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी आक्रमक पवित्रा घेत हा आरोप फेटाळून लावला. जागा विकलेली नसून भाडेतत्त्वावर देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आजमी यांच्या आरोपावरून संतप्त झालेल्या शिंदे यांनी काँग्रेसला थेट लक्ष्य करत, “मुंबई पालिकेत काँग्रेसच्या नेत्यांनी ‘झूठ की गुंज’ असा कार्यक्रम सुरू केला आहे. त्यांच्या नेत्यांनी देशात केला, यांनी इकडे पालिकेत केला आहे. खोटं बोला, पण रेटून बोला, असं सुरू आहे,” असा सणसणीत टोला लगावला.
यावेळी शिंदे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. महापालिकेच्या सभागृहात चुकीची किंवा खोटी माहिती मांडून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, वरळीतील डांबर निर्मिती प्लांटची जागा विकण्यात आल्याचा आरोप आजमी यांनी केल्यानंतर त्यावरून दोन्ही बाजूंमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. जमीन विकली नसून भाडेतत्त्वावर दिल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केल्याने आरोपांच्या मुद्द्यावरून सभागृहातच जोरदार वाद रंगला.
सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोप-प्रत्यारोपांनी स्थायी समितीची बैठक चांगलीच तापली. काही काळ सभागृहात गदारोळाचे वातावरण निर्माण झाल्याने वरळीच्या डांबर प्लांटच्या जागेचा मुद्दा बैठकीत चांगलाच पेटला.


No comments:
Post a Comment