मुंबईत दुसरी गणेशमूर्ती कोसळली; कुर्ल्यात स्पीड ब्रेकरवर तोल जाऊन दुर्घटना, दोघे किरकोळ जखमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 September 2026

मुंबईत दुसरी गणेशमूर्ती कोसळली; कुर्ल्यात स्पीड ब्रेकरवर तोल जाऊन दुर्घटना, दोघे किरकोळ जखमी


मुंबई JPN NEWS - गणेशोत्सवाच्या काळात मूर्ती कोसळण्याची आणखी एक घटना मुंबईत घडली आहे. कुर्ला पश्चिमेकडील एलबीएस रोडवर शितल तलावाजवळ गणेशमूर्ती घेऊन जात असताना स्पीड ब्रेकरवर तोल जाऊन मूर्ती खाली कोसळली. ही घटना मंगळवारी, ८ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ९.४५ वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धारावीतील एका गणेश मंडळाची मूर्ती विद्याविहारहून धारावीकडे नेण्यात येत होती. शितल तलावाजवळील स्पीड ब्रेकरवरून मूर्ती नेत असताना अचानक तिचा तोल गेला आणि मूर्ती खाली कोसळली. या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर गणेश मंडळाच्या प्रतिनिधींनी मूर्ती शितल तलावात विसर्जित केली.

दोघे किरकोळ जखमी - 
मूर्ती कोसळताना झालेल्या दुर्घटनेत संतोष जैस्वाल (२८) आणि रोहित जैस्वाल (२५) हे दोघे किरकोळ जखमी झाले. त्यापैकी एकाला कुर्ला भाभा रुग्णालयात, तर दुसऱ्याला हबीब रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. दोघांवर उपचार करून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मुंबईत मूर्ती कोसळण्याची दुसरी घटना - 
गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत गणेशमूर्ती कोसळण्याची ही दुसरी घटना असल्याने सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मोठ्या मूर्तींची वाहतूक करताना रस्त्यावरील स्पीड ब्रेकर, खड्डे आणि इतर अडथळ्यांमुळे दुर्घटना होऊ नये, यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मूर्ती वाहतूक करताना झालेल्या या दुर्घटनेमुळे गणेश मंडळांच्या सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS