
मुंबई JPN NEWS - गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात धान्य दुकानाविरोधात रेशनिंग अधिकाऱ्यांकडे तक्रार न करण्यासाठी दुकानदाराकडून एक लाख रुपयांची कथित खंडणी मागितल्याप्रकरणी एका YouTube Channel Reporter ला पोलिसांनी रंगेहात अटक केली. झेन नफीझ हैदर सय्यद असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून खंडणीच्या रकमेतील २५ हजार ५०० रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदाराचे धान्य दुकान सुरू ठेवण्यासाठी तसेच दुकानातील धान्याचा काळाबाजार होत असल्याची रेशनिंग अधिकाऱ्यांकडे तक्रार न करण्यासाठी आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी तक्रारदाराकडे एक लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. यातील ५० हजार रुपये १७ सप्टेंबर रोजी स्वीकारण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. उर्वरित रक्कम न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे.
१९ सप्टेंबर रोजी उर्वरित रक्कम देण्यासाठी पुन्हा मागणी करण्यात आल्यानंतर तक्रारदाराने याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर देवनार पोलिसांनी सापळा रचला. ठरलेल्या ठिकाणी २५ हजार ५०० रुपये स्वीकारल्यानंतर आरोपी तेथून निघून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला पकडल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी २० सप्टेंबर २०२६ रोजी देवनार पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८३४/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८(५) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे.
या प्रकरणातील इतर साथीदारांचा शोध सुरू असून, खंडणीची मागणी, यापूर्वी स्वीकारण्यात आलेली रक्कम आणि आरोपींच्या भूमिकेबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


No comments:
Post a Comment