
मुंबई JPN NEWS - दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोविंदा पथकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. उत्सवादरम्यान गोविंदा जखमी झाल्यास त्यांना तातडीने उपचार मिळावेत, यासाठी पालिकेच्या प्रमुख आणि उपनगरीय रुग्णालयांमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. जखमी गोविंदांवर मोफत उपचार करण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी दिले आहेत.
दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे रचताना गोविंदांना दुखापत होण्याची शक्यता लक्षात घेऊन पालिका रुग्णालयांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शीव येथील लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालय, परळ येथील के.ई.एम. रुग्णालय आणि मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयासह उपनगरीय रुग्णालयांमध्ये उपचाराची तयारी करण्यात आली आहे.
१६ उपनगरीय रुग्णालयांमध्ये एकूण १०५ रुग्णशय्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. प्रत्येक रुग्णालयात आवश्यकतेनुसार पाच ते दहा खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय प्रमुख रुग्णालयांमध्येही आपत्कालीन उपचारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध ठेवण्यात आल्या आहेत.
तीन पाळ्यांमध्ये वैद्यकीय पथके
किरकोळ दुखापत झालेल्या गोविंदांवर रुग्णालयात प्रथमोपचार करून त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. गंभीर दुखापत झालेल्या किंवा दीर्घकाळ उपचारांची आवश्यकता असलेल्या गोविंदांसाठी आवश्यकतेनुसार पुढील उपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
यासाठी पालिकेच्या रुग्णालयांमध्ये तीन पाळ्यांमध्ये वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. औषधे, इंजेक्शन, सर्जिकल साहित्य तसेच प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) आदी साहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच एक्स-रेसह आवश्यक वैद्यकीय उपकरणे कार्यरत स्थितीत ठेवण्यात आली आहेत. दहीहंडीच्या दिवशी डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सतर्क राहावे, अशा सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत.
दहीहंडी उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास जखमी गोविंदांना वेळेत आणि आवश्यक उपचार मिळावेत, यासाठी पालिकेची आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


No comments:
Post a Comment