
मुंबई JPN NEWS - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एम/पूर्व विभागातील कामाचे बिल मंजूर करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी महापालिकेच्या दोन लोकसेवकांसह एका खासगी इसमाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई केली आहे. याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ACBच्या प्रेसनोटनुसार, तक्रारदाराने एम/पूर्व विभागाच्या कार्यक्षेत्रात ‘पिंक आर्मी’ योजनेअंतर्गत तसेच सार्वजनिक शौचालय स्वच्छतेचे काम केले होते. या कामाचे बिल मंजूर करून देण्यासाठी महापालिकेचे सहाय्यक अभियंता गणेश हनमंतराव चांदोलकर आणि उपअभियंता अविनाश दत्तात्रय दुधभाते यांनी तक्रारदाराकडे ३ लाख ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने ५ मे २०२६ रोजी मुंबई विभागातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर ६ मे २०२६ रोजी करण्यात आलेल्या पडताळणीत गणेश चांदोलकर यांनी तक्रारदाराकडे २ लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याचे ACBने म्हटले आहे.
तसेच, उपअभियंता अविनाश दुधभाते आणि खासगी इसम विनित खाडे यांनीही लाचेची मागणी केल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले. त्यानंतर खासगी इसम विनित खाडे याने लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केल्याचे ACBच्या प्रेसनोटमध्ये नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक २९/२०२६ नुसार भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ मधील कलम ७ आणि ७(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम ३५(३) अन्वये नोटीस देण्यात आली आहे. ACBच्या नोंदीनुसार ३० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२.२५ वाजता आरोपींवर कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई विभागाकडून सुरू आहे.
दरम्यान, भ्रष्टाचार किंवा लाच मागणाऱ्या लोकसेवकाबाबत माहिती असल्यास नागरिकांनी ACBशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ACB मुंबई विभागाचा हेल्पलाइन क्रमांक १०६४, व्हॉट्सॲप क्रमांक ८८२८२४१०६४ असून दूरध्वनी क्रमांक ०२२-२४९२१२१२ / ०२२-२४९२२६१८ आहेत.


No comments:
Post a Comment