
रायगड / मुंबई JPN NEWS - पर्यटनासाठी दिवेआगर येथे आलेल्या आळंदी, पुणे येथील विनर्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांच्या सहलीला गुरुवारी, १ ऑक्टोबर रोजी दुर्दैवी वळण लागले. समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे आळंदी तसेच पुणे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आळंदी येथील इयत्ता ११ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विनर्स अकॅडमीचा विद्यार्थी व शिक्षकांचा गट दिवेआगर येथे सहलीसाठी आला होता. उपलब्ध माहितीनुसार, गटातील काही विद्यार्थी समुद्रात उतरले. मात्र, समुद्रातील पाण्याची खोली, लाटा आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात वाहून गेल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, बचाव पथक आणि पोलिसांनी तातडीने मदत व शोधमोहीम सुरू केली. आठही विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले असून पुढील वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
घटनास्थळी पोलीस, महसूल आणि आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरू आहे. या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांकडून आवश्यक तपास आणि कायदेशीर प्रक्रिया करण्यात येत आहे.
या घटनेने विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून आळंदी आणि पुणे परिसरात शोककळा पसरली आहे.
मृत विद्यार्थ्यांची नावे :
1. यश किरण वानखेडे
2. सोहम तुकाराम भांडवलकर
3. तन्मय दत्तात्रय वाहिले
4. कौस्तुभ संदीप दौंड
5. कैवल्य वासनकर
6. राजवीर वाहिले
7. प्रणव बनसोडे
8. सुमित अहिरे


No comments:
Post a Comment